महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती

राज्यातील २९ महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत असून ३ कोटी ४८ लाख ७९ हजार ३३७ मतदारांकरिता ३९ हजार ९२ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात १५ हजार ९०८ उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.

पुढे बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा १५ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत असल्याचे सांगितले.

दिनेश वाघमारे पुढे बोलताना म्हणाले की, मतदान सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधीत ठिकाणी १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सुरवात होईल. मतदारांमध्ये १ कोटी ८१ लाख ९४ हजार २९२ पुरुष, १ कोटी ६६ लाख ८० हजार ४४९ महिला; तर ४ हजार ५९६ इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण ३९ हजार ९२ मतदान केंद्रांपैकी एकूण ३ हजार १९६ संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगितले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ४३ हजार ९५८ कंट्रोल युनिट आणि ८७ हजार ९१६ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ११ हजार ३४९ कंट्रोल युनिट आणि २२ हजार ६९८ बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.

बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: ४ मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी ३ ते ५ मते देणे अपेक्षित असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे २२७ प्रभाग असून यासह सर्व महानगरपालिका मिळून ८९३ प्रभाग आहेत. त्यात २ हजार ८६९ जागांचा समावेश आहे. त्यासाठी १५ हजार ९०८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

पोलीस बंदोबस्त

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात ३ अपर पोलीस अधीक्षक, ६३ पोलीस उप अधीक्षक, ५६ पोलीस निरीक्षक, ८५८ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि ११ हजार ९३८ पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर ४२ हजार ७०३ होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण ५७ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राजकीय पक्षांची बैठक

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारी; तसेच १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गच्या १२५ पंचायत समितींच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान, मतमोजणी; तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत उपस्थित प्रतिनिधींना अवगत करण्यात आले.

मतदान नक्की करा

“महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या शहराच्या- महानगराच्या जडणघडणीत योगदान द्यावे आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रीय सहभाग नोंदवावा. आपलं मत आपल्या शहराचं भवितव्य ठरवू शकतं. कारण ते अनमोल आहे. लोकशाहीतला तो आपला महत्वाचा हक्क आहे आणि तो आपण मतदानाच्या माध्यमातून बजवायला हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मतदारांना आवाहर केले आहे.”

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची फलश्रुती गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.० मुळे राज्यात जलसाठा क्षमता वाढ

राज्यातील जलसुरक्षा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *