Breaking News

महाविकास आघाडीच्या आंदोलना विरोधात भाजपाचे ‘जागर जाणीवेचा’ प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावती आणि मुंबईत भाजपाचे आंदोलन

बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच महिला अत्याचार प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ,आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड आदी नेत्यांनी यात सहभाग घेतला. बदलापुरात घडलेल्या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबीयांबद्दल यावेळी संवेदना व्यक्त करण्यात आल्या.

बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर ‘जागर जाणिवेचा’ हे अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी अमरावती येथील इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “केवळ बदलापूरच नव्हे, जिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष खासदार डॉ.अनिल बोंडे,माजी खासदार नवनीत राणा, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ.आशिष देशमुख, जयंत डेहनकर यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

बदलापूर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारकडे केली असे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशा संवेदनशील घटनांकडे राजकीय हेतुने पाहू नये. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काम करायला पाहिजे, त्या कुटुंबीयांना आधार द्यावा. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आणि घटना असतात. अशा पद्धतीच्या अनेक घटना महाविकास आघाडीच्या काळातही झाल्या, पण त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात असताना सरकारच्या पाठिशी राहण्याचे काम केले, अशी आठवण त्यांनी करून दिली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंबईतील मादाम कामा रोड येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मविआ नेत्यांचा निषेध करणारे फलक हाती घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल देखील बोला, अशा आशयांचे फलक घेऊन उद्धव ठाकरे, शरद पवार ,सुप्रिया सुळे, नाना पटोले ,विजय वडेटटीवार, अंबादास दानवे, जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यात आले. या वेदनादायी प्रसंगात घाणेरडे राजकारण करत मविआ चे नेते आत्ता संस्कृती विरुद्ध विकृती असा नारा देत आहेत.मात्र महिला सुरक्षा, महिला सन्मानाचा बुरखा कशाला पांघरताय असा परखड सवाल चित्रा वाघ यांनी केला.

आ. प्रविण दरेकर म्हणाले की, दिशा सालियान च्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न मविआ सरकारने केला होता. संभाजी नगर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा युवा कॉंग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले तेव्हा साधा एफआयआरही दाखल केला गेला नाही. त्यावेळी आम्ही कधीच राजकारण केले नाही. २००४ ते २०१४ या दरम्यान युपीए सरकारच्या कार्यकाळात देशात झालेल्या महिला अत्याचाराच्या दुर्दैवी घटनांची लांबलचक यादी असताना मविआचे नेते आता मात्र निर्लज्जपणे बदलापूर घटनेमध्ये राजकीय पोळी भाजत आहेत असेही प्रविण दरेकर यांनी नमूद केले.

या आंदोलनात जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, जिल्हा उपाध्यक्ष जयवंत दळवी, मंजुषा कुद्रुमुती, मंजुषा जोशी, निलेश देवगीरकर आदी सहभागी झाले होते. आ. प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सायन सर्कल येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले .

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *