आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला. तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या दरबारात घेऊन जाणार असल्याचेही यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले.
मविआ अर्थात महा आघाडीच्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. काल परवा पर्यंत राज्यातील शाळकरी मुलींची सुरक्षा धोक्यात आली. ४ आणि ५ वर्षाच्या मुलीवरही अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या मुलीही आता सुरक्षित राहिल्या नाहीत. त्यातच आता सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार आणि मंत्रीही सुरक्षित राहिले नाहीत. त्यांच्या खुले आम हत्या होत आहे. जिथे सत्ताधारी आमदार आणि मंत्रीच सुरक्षित राहिले नाहीत. तिथे सर्वसामान्य जनता कशी सुरक्षित असेल असा उपरोधिक सवालही यावेळी केला.
तसेच नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात असलेले अनेक उद्योग हे गुजरात पाठविले. राज्यातील रोजगारांच्या संधी कमी केल्या. इतक्याच काय धारावीसाठी मुंबईतल्या अनेक जमिनी मोदींच्या मित्रांच्या घशात घातल्याचा आरोप केला. त्यामुळेच आम्ही गद्दारांचा पंचनामा आज जाहिर करत असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कामगारांनाही सुरक्षा पुरविली असेल पण त्यांची सुरक्षा किती मजबूत आहे असा सवालही यावेळी उपस्थित केला.
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, राज्यातील कायदा व सुव्यवस्था फारच चिंताजनक झालेली आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमुळे तर पोलिसांची सुरक्षा दिलेली असतानाही त्यांची हत्या घडण दुर्दैवी असल्याचे सांगत या सरकारकडून आता सत्ता हिसकावून घेण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री पद ज्यांच्या हातात आहे. त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरली आहेत. त्यांना इतर राज्यांप्रमाणे इथली परिस्थिती निर्माण करायची होती तशीच इथली परिस्थिती निर्माण करून ठेवल्याचा आरोपही यावेळी केला.
शरद पवार यांच्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, मी जसे काल दसरा मेळाव्यात सांगितले तसे हा फुले-शाहू-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र कधीही मोदी शाह यांचा कधीही होऊ देणार नाही. या सरकारचे राजीनामे आतापर्यंत अनेकांनी मागितले आहेत. पण मी या सरकारला सत्तेतून फेकून देण्याची वेळ आल्याचे सांगत भाजपाचे इतके मोठे दुर्दैव आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील गद्दारांना सोबत घेऊन आणि त्यांना नेते बनवून आमच्याशी लढण्यासाठी वापर करावा लागत आहे. या गद्दारांनी राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळवून लावले. इथल्या तरूणांचे रोजगार घालवले इतकेच काय राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होतच असून त्या रोखण्यासाठी हे गद्दारांच सरकार काहीच करत नसल्याचा आरोपही यावेळी केला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या इथे ७ हजारांच्या पोलिस भर्तीसाठी दिड लाख ते दोन लाख उमेदवारांचे अर्ज आले होते. यावरून तुमच्या लक्षात येईल की राज्यात किती मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बदलापूर प्रकरणात जे एनकाऊंटर झाले, त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी स्वतःचे मोठ मोठे पोस्टर लावत स्वतःकडे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच दुसरे सहकारी मोठ मोठ्या फिल्मस्टारसोबतच्या जाहिराती आणि लोकांच्या हिताच्या योजना राबवत असल्याचा देखावे सध्या दाखविण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने सवाल की, महाविकास आघाडीने अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा अद्याप जाहिर केला नाही.
त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्या दिवशी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात येईल त्याच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहिर करण्यात येईल. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, भाजपाला आणि महायुतीला मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा सापडत नसल्याची टीकाही यावेळी केली.
उद्धव ठाकरे यांच्या उत्तरानंतर शरद पवार आणि नाना पटोले यांनीही उद्धव ठाकरे यांनी दिलेले उत्तरच आमचेही उत्तर असल्याचे सांगितले.
उद्धव ठाकरे यांना प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीने प्रश्न केला की, हरियाणामध्येही भाजपाच्या विरोधात वातावरण असताना तेथे भाजपाच सत्तेत आली तसे इथे महाराष्ट्रात होणार नाही का असे विचारले असता, उद्धव ठाकरे म्हणाले की, हरियाणातील विजयाची चर्चा सर्वजण करत आहेत. मात्र जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाचा जो सफाया झाला त्याबद्दल कोणी चर्चा करत नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपाला फक्त १.२३ टक्के मते मिळाली. जम्मू मध्ये तर भाजपाला जास्त जागा मिळायला होत्या. पण मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता एवढ्या कमी मतांमुळे २३ जागा कशा काय येवू शकतात असा सवालही यावेळी उपस्थित केला.
महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद | मुंबई – #LIVE https://t.co/4SfAqyxU5T
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 13, 2024
Marathi e-Batmya