Breaking News

राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांची तातडीने घोषणा येत्या रविवारी गेट वे ऑफ इंडियाजवळ आंदोलन करणार-पत्रकार परिषदेत माहिती

मालवण येथील राजकोट येथील ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमधील राड्यानंतर मुंबई शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने बैठक घेत मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या तिन्ही नेत्यांनी शिवप्रेमीकडून गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याचे दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. मात्र राज्यातील सरकार हे या पुतळ्याची जबाबदारी नौदलावर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आज पाहणी करण्यासाठी गेलेल्या महाविकास आघाडीचे नेते आणि समर्थकांवर हल्लाही करण्यात आला. त्यामुळे हे सरकार फुटीरांचे सरकार असून स्वतःला या घटनेपासून वाचविण्यासाठी आता नौदलाचे नाव पुढे करत असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, रायगड आणि गेट वे ऑफ इंडिया येथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून किती वर्षे झाली, पण तो पुतळा तितक्याच मजबूतीने आजही आहे तसाच आहे. मात्र केवळ लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवून घाईने तेथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. तेथेच ३००-४०० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेला किल्ला अद्यापही आहे तसाच आहे. त्यास काहीही झाले नाही. मात्र आठ महिन्यापूर्वी उभारलेला किल्ला कोसळून पडतो याचा अर्थ काय असा सवाल करत कदाचित टक्केवारीतून तो पुतळा उभारल्याने पुतळा कोसळला असावा अशी खोचक टीकाही यावेळी केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारला कोणत्याच संवेदना नसून पुतळा पडल्यानंतरही या सरकारमधील मंत्री केसरकर वाईटातून चांगले घडेल असे वक्तव्य करतात यावरून या सरकारची भावना किती शुध्द आहे हे समजून येत असल्याची टीकाही यावेळी केली.

तसेच जे शिवद्रोही आहेत, जे टेलिव्हिजनच्या माध्यमातून सर्वांसमोर आले असा उपरोधिक टीकाही नारायण राणे पिता-पुत्रांचे नाव न घेता केली.

यावेळी शरद पवार म्हणाले की, येत्या१ सप्टेंबर रोजी राज्यातील शिवप्रेमींच्यावतीने आंदोलन करणार असून या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करत या सरकार बदलण्याची वेळ आली असल्याचेही यावेळी आवर्जून सांगितले.

तर नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजाचे फक्त नाव घेणारे सरकार आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या विचारांचे सरकार नाही. खरे तर हे सरकार निवडूण देऊन चूक केली अशी टीका करत झालेल्या घटनेमुळे शिवाजी महाराजांची आम्ही माफी मागतो असे म्हणणारा एक व्हिडिओही काँग्रेसच्यावतीने जारी करण्यात आल्याचे सांगितले.

तसेच महाविकास आघाडीच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सरकारच्या विरोधातील शिवप्रेमींच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नाना पटोले यांनी यावेळी केले.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *