राज्य सरकारमध्ये बसलेले गद्दार एका महिन्यात बेरोजगार होणार असून आपल्याकडे रोजगार मागायला येतील. पण, एकाही गद्दरला मी रोजगार देणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रकल्पांच्या नावाखाली गद्दारांचे सरकार माझ्या महाराष्ट्राला लुटत आहे. मात्र एक महिन्यानंतर मविआचे सरकार आल्यावर त्याचा हिशोब मांडल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही यावेळी दिला.
शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी विलेपार्ले येथील बालाजी रेस्टॉरंटच्या पार्किंग मध्ये मुंबई पदवीधर मतदार संघाचे शिवसेना आमदार अनिल परब यांच्या विधान परिषद निवडणूक काळातील वचनपूर्तीनिमित्त शिवसेनेचा भव्य महा नोकरी मेळावा पार पडला. त्याच्या उद्घघाटन समारंभात उद्धव ठाकरे बोलत होते.
उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, गद्दारी करून आपले सरकार पाडल्यानंतर मागच्या अडीच वर्षात एकही नवा उद्योग राज्यात सुरू झाला नाही. आपण जे काही मोठे प्रकल्प आणले ते गुंतवणूकदार सुद्धा यांनी गद्दारी केल्यानंतर निर्माण झालेल्या राज्यातील अस्थिर वातावरणात यायला तयार नसल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू -मुस्लिम दंगली घडविण्याचे त्यांचे काम सुरू आहे. त्याच दंगलींचे भांडवल करून ही मंडळी सत्ता मिळवतात. शिवसेना सोडून राज्य सरकार किंवा इतर कोणता पक्ष नोकरी देण्याचे काम करतोय का ते त्यांनी येवून सांगावे असे आवाहन करत मुलगी शिकली, प्रगती झाली आणि १५०० देवून घरी बसवली, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपाला लगावला. पण आमच्या सरकारमध्ये असे होऊ देणार नाही, असे आश्वासनही युवकांना दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असल्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आज एका बाजूला पंतप्रधान त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला येत आहेत. कामे पूर्ण होत नाहीत मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे मात्र भरले जात आहेत. आपले हिंदुत्व लोकांच्या घरची चूल पेटवणारे असून भाजपाचे हिंदुत्व हे घर पेटवणारे आहे. म्हणूनच त्यांना शिवसेना संपवायची आहे, असा गंभीर आरोपही भाजपावर यावेळी केला.
उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात १५ तरुणांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीची पत्रे प्रदान करण्यात आली. या महा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने विमानतळासमोरील सहारा हॉटेल परिसरात बेरोजगार युवकांनी मोठी गर्दी केली होती. परिसरात सर्वत्र रोजगार मेळाव्याचे बॅनर आणि शिवसेनेचे भगवे झेंडे लागलेले होते. मेळाव्यासाठी इच्छुकांनी गुगल फॉर्मवर पूर्वी नोंदणी केलेली होती.
आमचे रोजगाराचे तर मिंधेंचे महाराष्ट्र विकण्याचे स्टॉल – शिवसेना नेते आदित्य ठाकरे
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मविआ सरकारच्या काळात आपण मग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या माध्यमातून ६.५ लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली. त्यातले बहुतांश उद्योग मिंधेनी गुजरात मध्ये पाठवले. आपण नोकरी देण्यासाठी स्टॉल लावले, मिंधेनी मात्र महाराष्ट्र विकण्यासाठी स्टॉल लावले असल्याची खोचक टीका करत आपले सरकार लवकर येणार असून सरकार आल्यानंतर दर चार महिन्यांनी नोकरीचे स्टॉल लावून प्रत्येक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देऊ, असे वचनही यावेळी दिले.
मेळाव्यात १२ हजार बेरोजगारांना मिळाली नोकरी – आमदार अनिल परब
राज्यात मागील अडीच वर्षात बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या मेळाव्यातून तरुणांना काम नाही हे दिसून येत आहे. १३४ कंपन्या इथे नोकरी देण्यासाठी आल्या आहेत. १६० स्टॉल्स मुलाखतीचे आहेत. आज १२,००० युवक -युवतींना रोजगार मिळाला आहे. सत्ता नसताना नोकरी देण्याचे काम आपण करत आहोत. रोजगार मेळावा आयोजित करणार म्हणून पदवीधर निवडणुकीत वचन दिले होते. त्याला जागण्यासाठी दरवर्षी नोकरी मेळावा आयोजित केला जाईल, असे मेळाव्याचे संयोजक आमदार अनिल परब यांनी सांगितले.
Marathi e-Batmya