Breaking News

एकतर तुम्ही किंवा मी अशा ईर्षेनेच मैदानात, उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा कुणाला? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला इशारा

खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्याला इशारा देत आता एक तर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत आता आदेशाची वाट बघू नका आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही यावेळी दिले.

शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात डांबण्याचा डाव रचला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला ही गोष्ट सांगितली होती. यापुढे मात्र गप्प रहायचे नाही. लढाईला तोंड फुटताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडायचे. तसे आपल्यावर येणाऱ्या शत्रूवर आता तुटून पडायचे असे उद्धव ठाकरे म्हणताच रंगशारदा सभागृह छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी दुमदुमले.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेत आणखी मोठ्या विजयाची अपेक्षा होती. निवडणुकीच्या निकालानंतर देशातील अनेक मोठ्या नेत्यांनी संवाद साधला आणि महाविकास आघाडी व शिवसेनेने देशाला नवी दिशा दाखवल्याची प्रतिक्रिया दिली होती असे सांगत कोरोना काळात शिवसेनेने कुणी आजारी आहेत का, कुणाला उपचार हवे आहेत का हे पाहण्यासाठी घर घर दस्तक मोहीम राबवली होती. तसेच काम आपण मतदार यादीसाठी करू शकतो. जे काम पक्षप्रमुख, शाखाप्रमुख करू शकत नाही ते गटप्रमुख करू शकतो. गटप्रमुखाने त्यांच्या विधानसभा क्षेत्रानिहाय मतदार याद्या बनवल्या आणि त्यानुसार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान मिळवून दिले तर आपण निश्चितच जिंकू शकतो, असे आवाहनही यावेळी शिवसैनिकांना केले.

पुढील काळात हिंदू धर्मातील अनेक सण येत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेबरोबर झालेली गद्दारी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव अशा उत्सवांच्या माध्यमातून जगासमोर आणा. उत्सव मंडळांच्या माध्यमातून ते काम करा, गणेशोत्सवातील देखाव्यांमधून गद्दारीचा उल्लेख करायला काहीच हरकत नाही. शंकराचार्य मध्यंतरी मातोश्रीवर येऊन गेले. विश्वासघात हा सर्वात मोठा घात आहे आणि विश्वासघात करणारा हिंदू असूच शकत नाही, याची आठवण करून दिली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, हा शिवसेनेतून गेला, तो गेला असे फोन सध्या अनेकांना येत असतील. पण कुणी पैसे देताहेत म्हणून आईशी गद्दारी करू नका, ज्यांना जायचे असेल त्यांनी आत्ताच जा, पण आत राहून दगाबाजी करू नका, असा इशारा देत तरीही नगरसेवक, माजी नगरसेवक ज्यांना जायचेय त्यांनी जा, एकतर तुम्ही रहा किंवा मी राहीन अशा ईर्षेनेच मी मैदानात उतरलोय. माझ्यासोबत राहतील ते माझे आणि समोर राहतील ते माझे शत्रू. शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या शिवसैनिकांना घेऊन मी जिंकून दाखवीन, असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तो निकाल पाच पंचवीस वर्षात लागेल अशी आशा मी कालच व्यक्त केली होती. तो पाच दिवसात, पाच वर्षात, पन्नास वर्षात लागेल…नक्कीच लागेल. शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयावर श्रध्दा आणि विश्वास आहे, मला माझे शिवसेना नाव पाहिजे आणि ते मला मिळणार, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच, निकाल लागेल तेव्हा लागेल पण आता मशालीचा प्रचार जोरदार करा, असे आवाहन यावेळी शिवसैनिकांना केले.

शिंदे गटाच्या शिवसेनेवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चोर लोकांनी ग्रामीण भागात धनुष्यबाण आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावल्याने लोकसभा निवडणुकीत अनेक जणांनी चुकून बो अॅन्ड अॅरो ला मते दिली होती. काही अमराठी लोकांनी आपल्याला ही माहिती दिली होती. विधानसभेत तसे होऊ नये म्हणून शिवसेनेने निवडणूक आयोगाला स्वत मशालीचे चिन्ह बनवून दिले आहे. पूर्वी धनुष्यबाणाचे चित्र बनवून शिवसेनेने दिले होते आणि त्याला आयोगाने शिवसेनेची निवडणूक निशाणी म्हणून मान्यता दिली होती. तशीच आता दिलेल्या मशालीच्या चित्रालाही मिळावी आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या चिन्ह मतपत्रिकेवर ठेवू नका, अशी विनंती आयोगाला केल्याचे सांगत आमदार अपात्रतेप्रमाणे त्याचाही निकाल कदाचित साठ पासष्ट वर्षात लागेल, असा टोला यावेळी लगावला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *