वर्षा गायकवाड यांचा सवाल, लोकलमध्ये महिलांवर हल्ले होत असताना सुरक्षा यंत्रणा झोपा काढते काय? नायगाव रेल्वे स्टेशनवरील हल्ल्यात हात गमवावा लागलेल्या मुलीला रेल्वेने भरीव आर्थिक मदत करावी व उपचाराचा सर्व खर्चही करावा, हल्लेखोराला कठोर शिक्षा करा ..

मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित आहे असे म्हटले जायचे पण मागील काही वर्षापासून मुंबईतील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. सरकार करत असलेले सुरक्षेचे सर्व दावे खोटे असून लोकल प्रवासातही महिला सुरक्षित नाहीत. नायगाव रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करून तीला रेल्वे रुळावर फेकण्याचा प्रकार मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगणारा आहे. एवढी मोठी घटना होत असताना रेल्वे पोलीस व सर्व सुरक्षा यंत्रणा काय झोपा काढत होत्या काय? असा संतप्त सवालमुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

भाजपा महायुती सरकारवर तोफ डागत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, लोकल प्रवासाला मुंबईकरांची लाईफलाईन म्हटले जाते पण ती आता डेथलाईन ठरत आहे. लोकलच्या डब्यात एका तरुणाला चाकूने भोसकून त्याची हत्या करण्यात आली. दुसऱ्या घटनेत रेल्वे स्टेशनच्या समोर गंभीर हल्ला करण्यात आला. महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत. रेल्वेच्या डब्यात व रेल्वे स्टेशनवर पुरेशी सुरक्षा यंत्रणा दिसत नाही. एखादी घटना घडली की सरकार व प्रशासन जागे होते व सुरक्षा व्यवस्थेचे मोठे मोठे दावे केले जातात पण प्रत्यक्षात वेगळीच परस्थिती आहे. नायगाव घटनेत त्या मुलीचा एक हात कोपरापासून कापावा लागला आहे, या मुलीला रेल्वेने भरीव आर्थिक मदत करावी व तीचा उपचाराचा सर्व खर्चही करावा, तसेच हल्लोखाराला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.

वर्षा गायकवाड शेवटी बोलताना म्हणाल्या की, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेसंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेक बैठका झाल्या, पत्रव्यवहार झाला पण वरिष्ठ अधिकारी हे लोकप्रतिनिधींनाही जुमानत नाहीत. सरकार व रेल्वे प्रशासनाच्या कारभारात काही सुधारणा होताना दिसत नाही हे अत्यंत गंभीर आहे. मुंबईकरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुजोर व कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुंबईकरांच्या सुरक्षेला व सोई सुविधांना प्राधान्य दिले पाहिजे. मुंबईच्या सुरक्षेच्या प्रश्नावर व नागरी समस्यांप्रश्नी आम्ही सरकारला यापुढेही जाब विचारत राहू, असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

पुणे व बीड जिल्ह्यात विविध उपक्रम; आदिवासी बांधवांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *