राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यात (परांडा तालुक्यातील मौजे लाची) येथे झालेल्या पावसामुळे १२ नागरिक अडकले होते. या नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी नाशिकवरून एअर फोर्सचे हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहे आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे येथील एक पथक रवाना करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) धुळे येथील एक पथक पाठवण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यात नदीला आलेल्या पुरामुळे (सिंदफना नदी परिसर) या ठिकाणच्या नागरिकांना मदत व बचाव कार्यासाठी नगरपालिका बीड यांच्याकडील बोट पाठविण्यात आली. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) पुणे एक पथक शोध व बचाव कार्यासाठी पाठवण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात सिना आणि भोगावती नदीला आलेल्या पुरामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) चे एक पथक रवाना व नगरपालिका बार्शी अग्निशमन दलाची बोट घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. तसेच सीना नदीकाठच्या सर्व नागरिकांना राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सचेत ॲप मधून सतर्कतेचा संदेश देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील चार गावे पूरग्रस्त असून हिवरा नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने मदत व बचाव कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठवण्यात आले आहे.
नागरिकांना आवाहन
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे. नदीकाठच्या व कमी उंचीच्या भागातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. प्रशासनास व बचाव पथकांना सहकार्य करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त पथके व साधनसामग्री तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
संपर्क :- राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९, ९३२१५८७१४३
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र धाराशिव- ०२४७२-२२७३०१,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र अहिल्यानगर- ०२४१-२३२३८४४,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र बीड – ०२४४२-२९९२९९,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र सोलापूर- ०२१७-२७३१०१२,
जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्र जळगाव -०२५७-२२१७१९३/२२२३१८०
Marathi e-Batmya