Breaking News

आठवले, आंबेडकरांना वगळून दलित संघटनांचा सरकारच्या विरोधात महामोर्चा भीमा कोरेगांव प्रकरणी संविधान परिवाराच्या नावाखाली निघणार मोर्चा

मुंबई : प्रतिनिधी

भिमा कोरेगाव प्रकरणा नंतर राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी २८ फेब्रुवारी रोजी विधानभवनावर दलित समाजातील सर्व संघटनांच्यावतीने संविधान परिवाराच्यावतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या महामोर्चापासून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांना लांब ठेवण्यात येणार असल्याची माहिती संविधान महामोर्चाच्या निमंत्रण समितीने दिली.

या मोर्चात भाजप-सेना सरकार व आरएसएसच्या विरोधात असून संविधान मानणा-या पक्ष संघटनांचा हल्ला बोल असणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी चेंबूर येथील महाराणा हॉटेलात आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, गंगाराम इंदिसे, मनोज संसारे, गायक विष्णू शिंदे, अशोक कांबळे, अमोल बोधिराज, मोहिनी अनावकर आणि अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे नेते आणि भीम आर्मीचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोर्चा नंतरची भूमिका काय ? आम्ही जनतेपुढे जाताना जनतेला कोणता विश्वास द्यावा? हे स्पष्ट करण्यात यावे. असेही मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम मोर्चा यशस्वी करण्याबाबत सर्वानुमते ठरविण्यात येते.

संविधानप्रेमी जनतेनं या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच मोर्चा नंतर एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा रहावा. याकरिता निकराचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासनही यावेळी उपस्थित नेत्यांनी दिले.

संविधान परिवार मोर्चा करीता यावेळी निमंत्रक कमिटी घोषित करण्यात आली. यामध्ये स्वारिपचे अरूण जाधव, अमित हिरवे, राष्ट्रीय दलित पॅथरचे वसंत कांबळे, मुरलीधर जाधव, आरपीआय (ऐकतावादी) मनोहर आगळे, बाबा शिंदे, पीआरपीचे मिलिंद सुर्वे, राजेश जाधव, रिपब्लिकन जनशक्तीचे सुजित पगारे, परिवर्तन कलामंचचे अशोक निकाळजे, वैशाली शिंदे, संगीतकला अकादमीचे दिनेश जाधव, आनंद अहिरे, एकता कला मंचाच्या मिनाक्षी थोरात, लोक कलावंत सांस्कृतिक मंच विनोद विद्यागर, रामलिंग जाधव यांची निमंत्रण समितीत निवड करण्यात आली.

यावेळी संविधान परिवार मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात जाहीर सभा घेण्यात येणार असून १२ फेब्रुवारी पासून सभा घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. याची सुरुवात नाशिकपासून करण्यात येणार असून त्यानंतर मनमाड, पुणे, कराड (सातारा), कल्याण आणि उल्हासनगर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई यासह विविध ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहेत.

One comment

  1. कवाडे, संसारे, हंडोरे, इंदिसे, डांगळे हे लोक म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या ताटाखालच मांजर.
    आपल्या मालकांना सोडून यांना आणि आपल्या छटाकभर पक्ष – संघटनानच विसर्जन करून मोर्चा काढला तर कमीत कमी लोकांनी यांना ग्राह्य धरलं असत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत