२००५ साली बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रमोद महाजन आणि मनोहर जोशी यांनी त्यांना ‘मातोश्री’वर जाऊन सकाळीच शुभेच्छा दिल्या. त्यावेळी एक अतिशय सुंदर छायाचित्र स्वतः उद्धव ठाकरे यांनी काढले. यावर स्व. प्रमोद नवलकर यांनी शिवसेनेवर हृदयस्पर्शी लेख लिहिला…
शिवसेना अभेद्य !
काहीजण रोज उठल्याबरोबर घोषणा करायची, ‘शिवसेना संपली’ आणि झोपताना प्रार्थना करायाची की, शिवसेना संपावी, हे आजच नव्हे तर शिवसेनेच्या जन्मापासून चाललेले आहे. जन्मतःच शिवसेनेचा गळा घोटण्यासाठी लालबाग-परळमध्ये कंसमामा लपून बसले होते ते कंसमामा संपले, पण शिवसेना संपली नाही.
नंतर मोरारजी नावाच्या एका गांधीवाद्याने शिवसेना संपवण्याची घोषणा करून एका शिवसैनिकाला माहीमच्या नाक्यावर चिरडले… त्यांनी तर शिवसेना संपवण्याचा विडाच उचलला आणि पेणकरने हौतात्म्य पत्करले, पण शिवसेनेला वाचवले. याचवेळी मोडक अधिकारी अवतरले… बाळासाहेबांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंत सर्वांना एका रात्रीत तुरुंगात डांबले. दत्ताजी साळवीदेखील त्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. तो बंदीयज्ञ पूर्ण झाल्यावर मोडकांनी जाहीर केले की, ‘शिवसेना संपली’. पण औरंगजेबाने शिवाजी महाराजांना तुरुंगात डांबल्यावर मराठ्यांचे राज्य अस्तास जाण्याऐवजी महाराज तुरुंगातून बाहेर आले आणि मोठ्या वैभवाने मराठेशाहीची स्थापना होऊन त्यांचा राज्याभिषेक झाला.
पुन्हा पुनरावृत्ती विसाव्या शतकात झाली. शंकरराव बोलले ‘शिवसेना संपली.’ शिवसेना संपली’, डांगे बोलले ‘शिवसेना संपली’, मृणाल गोरे बोलल्या ‘शिवसेना संपली.’ अहिल्या बोलल्या ‘शिवसेना संपली’, पण प्रत्यक्षात मात्र शिवसेना वाढतच राहिली. १९७१ च्या निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीत मी एकटाच निवडून आलो. बाकीचे पराभूत झाले. तेव्हा काँग्रेसवाले जल्लोष करून म्हणाले, ‘शिवसेना संपली’. पत्रकार तर ‘शिवसेना संपली’ म्हणून आंदोलने, श्रद्धांजली वाहून मोकळे झाले. पण प्रत्यक्षात शिवसेना सर्वांना पुरून उरली आणि देशव्यापी बनली.
दुर्दैवाने शिवसेनेतील काही लोकांनी जणू आपणच ‘शिवसेना’ आहोत असा गैरसमज पर्वीपासून करून घेतला आहे. मला आठवते, डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांच्यासारख्या एका सज्जन माणसाचादेखील तसाच कोणीतरी गैरसमज करून दिला होता. त्यामुळे त्यांनीदेखील शिवसेना सोडताना ‘शिवसेना संपली’ ही पहिलीच घोषणा केली. त्यानंतर अधूनमधून काही वैयक्तिक कारणासाठी किंवा महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते की, शिवसेना संपली. मला ती कविता आठवत नाही. त्या कविकल्पनेप्रमाणे झाडावरून पडणाऱ्या प्रत्येक सुकलेल्या पानाला भास होतो की झाड पडते आहे. पण पाने गळून पडली तरी झाड तसेच उभे राहते, पालवी फुटते, बहर कायम राहतो.
असा गैरसमज करून घेणाऱ्यांना एक वेळ क्षमा करता येईल, पण शिवसेना संपावी असा पापी विचार मनात आणणाऱ्यांना मात्र काळ कदापि क्षमा करणार नाही. कारण शिवसेना म्हणजे सहजतेने वितळणारा नैनिताल आणि कश्मीरमधील बर्फ नाही. तो त्याही पलीकडे मजबुतीने उभा राहिलेला हिमालयाचा कडा आहे. तो लक्षावधी शिवसैनिकांच्या त्यागातून आणि परिश्रमातून उभा राहिल्याने हजार वर्षे झाली तरी वितळणार नाही. त्याचेच प्रमुख कारण म्हणजे ती शिवसेना केवळ मराठी माणसाचीच नव्हे, तर आज काळाची गरज बनली आहे. शिवसेना म्हणजे भांडवलदारांची गिरणी नाही की केव्हाही व्ही.आर.एस. देऊन तिला टाळे ठोकता येईल. इतर संपले आणि सत्य उरले. त्याप्रमाणे शिवसेना संपवणारे संपतील आणि रक्ताच्या थेंबाथेंबात शिवसेना असलेला सैनिक मात्र कधीच संपणार नाही. गेल्या चाळीस वर्षांत काँग्रेसपासून ते हिंदू महासभेपर्यंत सर्व पक्ष संपले किंवा रिलायन्सप्रमाणे त्याचे विभाजन झाले.
शिवसैनिकहो, आज शिवसेनेत चौथी पिढी उदयाला येत आहे. पहिल्या पिढीचा इतिहास माहीत नसेल महणून मी हा उल्लेख केला. कारण मला नेहमी वाटत असते की, संस्थापक म्हणून बाळासाहेबांचे नाव इतिहासात कोरले गेले असले तरी या शिलालेखाचा पाया प्रबोधनकारांनी एका विशिष्ट ध्येयवादाने बांधला आहे. म्हणून शिवसैनिकहो. आपली गेल्या जन्माची पुण्याई म्हणून आज आपण लाचारीत गुरफटण्याऐवजी शिवसैनिक म्हणून स्वाभिमानाने जगत आहोत. सत्ता असो अगर नसो, पण महाराष्ट्राला मार्गदर्शन करण्याचे होकायंत्र आज शिवसेनाप्रमुखांच्या हाती आहे. अनेकदा दिल्लीतील गोंधळलेले राज्यकर्तेदेखील मार्गदर्शनासाठी त्या होकायंत्रात डोकावतात. महाराष्ट्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. कारण त्यांना माहीत आहे की, या राज्यात डोंगरमाथ्यांची रांगच रांग लागलेली आहे. त्या डोंगरांवरील एखादा दगड किंवा कडा जरी कोसळला तरी त्या दगडाचा काही डोंगर होत नाही, पण डोंगर मात्र कायम राहतो.
थोडेफार ढग आले तरी सूर्य कधी पराभूत होत नाही. त्सुनामीच्या लाटांनी समुद्र नष्ट झाला नाही किंवा सहयाद्रीवरील वणव्याने महाराष्ट्राची राख झाली नाही. माझ्या घरामागे एक प्रचंड वटवृक्ष आहे. दरवर्षी त्याची पाने गळून पडतात. कधी कधी पारंब्यादेखील तुटतात, पण तरीही चमत्कार म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी तो वड जसा होता तसाच मजबुतीने आज उभा आहे. म्हणून आजही कोणाच्या अविचाराने काही अप्रिय घटना घडत असल्या तरी आतापर्यंत अनेक प्रसंगांतून आणि संकटांतून निभावून समर्थपणे बाहेर पडलेल्या बाळासाहेबांच्या सच्चा शिवसैनिकाला खात्री आहे की, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषःकालbम्हणून तो शिवसैनिक एकविसाव्या शतकाचा पाया घालण्यासाठी दोन्ही बाहू उभारून सिद्ध झाला आहे. एक मात्र सत्य आहे ते म्हणजे ‘शिवसेना अभेद्य राहीलच…
संदर्भ – शिवसेना काल आज उद्या – मनोहर जोशी
Marathi e-Batmya