सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीतून राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण आणि आदर्शवत संस्थांमध्ये रूपांतर करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. आघाडीची कंपनी टोयोटा आणि आयटीआयच्या (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण प्रकल्प राबवला जात असून ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक प्रशिक्षणातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टोयोटा इंडियातर्फे एक्सलन्स सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दृकश्राव्य पद्धतीने एकाचवेळी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील आयटीआयमधील १७ संस्थांमध्ये १७ अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन झाले आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, टोयाटोचे रमेश राव, रवी सोनटक्के, रूपा बोहरा यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या कारकीर्दीत नवा अध्याय !
छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर विभागातील आयटीआय मध्ये तब्बल १७ विविध संस्थांमध्ये १७ अद्ययावत प्रयोगशाळांचे उद्घाटन केले. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने टोयोटा… pic.twitter.com/oDCnL7sk4K
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) March 5, 2026
टोयाटो कंपनीने सीएसआर निधीतून छत्रपती संभाजीनगर विभागातल्या चौदा तर नागपूर येथील तीन आयटीआय संस्थानामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारल्या आहेत. १७ प्रयोगशाळांसाठी पाच कोटी ४४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे पाऊल असून हा सीएसआर निधीचा आगळावेगळा कार्यक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात कौशल्य विकासाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले असून त्यानुसार देशभरात आधुनिकीकरण केले जात आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणात नाविन्य आणले जात आहे. यातून सर्व आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कार्यक्षमता जनतेसमोर आणणार आहे. या उपक्रमामध्ये औद्योगिक व्यवस्थापन, आधुनिक कौशल्य आणि औद्योगिक सुरक्षा समाविष्ट करण्यात आली आहे. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे, कार्यशाळा व उपकरणांचे आधुनिकीकरण, संबंधित कंपन्यांची औद्योगिक कार्य संस्कृती, कौशल्य ज्ञान, औद्योगिक संस्कार, शरीर व मन यांची क्रयशक्ती यांचा सर्वागीण विकास या प्रयोगशाळांच्या माध्यमाने साधले जाणार आहे.
शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने आयटीआयचे आधुनिकीकरण
पुढे बोलताना मंगलप्रभात लोढा म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर हा केवळ पहिला टप्पा असून शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून दुसऱ्या टप्प्यात (२०२६-२८) अमरावती, नागपूर आणि नाशिक येथे १८ तर पुढच्या टप्प्यात (२०२९-३०) मुंबई आणि पुण्यात १४ अशा ३२ आयटीआयमध्ये जागतिक रोजगाराच्या संधीचे उद्दिष्ठ ठेवले आहे.पहिल्या टप्प्यात १५ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक कामाचे प्रशिक्षण देवून रोजगारक्षम करण्यात येणार आहे. राज्यातील औद्योगिक विकासासाठी हा अतिशय महत्वाचा टप्पा असून पुढील काळात विविध कंपन्यांसोबत करार करण्यात येत आहेत. यापुढच्या काळात महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातील तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षणाचे बळ मिळून जागतिक स्तरावर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची विजयी पताका फडकणार असल्याचे सांगितले.
टोयाटोसोबत टीएनएस इंडियाचे सहकार्य
टीएनएस इंडिया कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सोलर टेक्निशियन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. टीएनएस इंडिया फाऊंडेशनतर्फे आयटीआयमध्ये ईव्ही आणि सौर उर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅम्पस इंडस्ट्रीयल करिअर्स कार्यक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल्समध्ये उद्योगातील अपेक्षा, नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये, ग्रीन स्किल्समध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Marathi e-Batmya