काही वर्षापूर्वी विमानाने आम्ही काही पत्रकार ईशान्य भारताला भेटीसाठी जाणार होता. त्यामुळे भल्या पहाटे राहत्या घरून भल्या पहाटे मुंबईतील सांताक्रुजच्या विमानतळावर पोहोचलो, साधारणतः सकाळी ७ ते ७.३० वाजताचं ते विमान असावं. आम्ही वेळेत पोहोचलो, तेथून चेक इन करण्यासाठी सर्वजण सुरक्षा दलाच्या निरिक्षणाखाली विमानतळावर रांगेत उभे होतो.
वास्तविक पाहता उस्ताद झाकिर हुसैन यांना मी पहिल्यादा भेटलो तेव्हा तो काळ ब्लॅक अॅड व्हाईट टिव्हींचा काळ होता, आणि रंगीत टिव्हीचा काळ नुकताच सुरु झाला होता. देशात काँग्रेसचं पी व्ही नरसिह राव यांचं सरकार होतं. अन् दूरदर्शवर सकाळनंतर थेट दुपारपासून प्रेक्षपणाला सुरुवात झाली होती. त्याकाळी “मिले सुर मेरा तुम्हारा” हे गाणं नेहमी दूरदर्शनवर लागायचं. मी ते गाणं जेव्हाही पाहायचो तेव्हा त्यात आग्र्याच्या ताजमहल समोर एक तरूण आणि वडीलकीच्या वयाचे दोघं जण तन्मयतेन तबला वाचवतात आणि एकमेकांना दाद देताना पहायचो, मला नेहमी प्रश्न पडायचा हे दोघे कोण इतकं छान कानाला ऐकायला गोडं असलेला तबला वाजवतात. एके दिवशी माझे वडील घरी होते, आम्ही संपूर्ण कुटुंबिय घरातील टिव्ही ऑन करून पहात होतं. त्यावेळी “मिले सुर मेरा तुम्हारा” हे गाणं दूरदर्शनवर सुरु झालं आणि ते दोघं ताजमहल समोर वाजवतानाचा एक सीन दिसायला लागला. मी माझ्यावडीलांना विचारले हे दोघे कोण आहेत, तबला फारच सुंदरतेन वाजवतात, वडीलांना मला सांगितले ते झाकिर हुसैन आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे वडील अल्लारख्खा आहेत.
त्यावेळी उस्ताद झाकिर हुसैन यांची भेट झाली. त्यानंतर केवळ उस्ताद झाकिर हुसैन आणि त्यांचे वडील अल्लारख्खा यांच्या वाजविण्यातील जुगलबंदीचा सीन पाहण्यासाठी ते गाणं फक्त पहायचो, आताही अनेकदा ते गाणं त्या दोघांचे तबला वादन ऐकण्यासाठीच पाहतो. उस्ताद झाकिर हुसैन यांच्या तबला वादनाच्या प्रेमातच मी वास्तविक पाहता पडलो होतो. त्यानंतर शाळेच्या वेळा वगळता, मी ही तबला वादनाचे शिकवणी वर्ग पाहु लागलो, मला तबला वादनाचा शिकवणी वर्ग काही केल्या मला कुठला रूचला नाही.
त्यानंतर पुढील दोन-चार वर्षात कधी नव्हे ते उस्ताद झाकिर हुसैन यांचा एक कार्यक्रम सोलापूरातील मॉडर्न शाळेत आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम पाहण्यासाठी आणि त्याचे तिकीट खरेदी करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्या कार्यक्रमाची तिकिटे काही केल्या मला मिळाली नाहीत. पण तबला वादकाची किर्ती आणि त्याचा आबच इतका असतो की, त्यांचे तबला वादन ऐकायला मिळावे म्हणून शाळेच्या प्रवेशद्वारा लगत थोडा अंधारा भाग होता, त्या ठिकाणी उभे राहुन उस्ताद झाकिर हुसैन यांचा तबला ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. पण हे एका पोलिसाने पाहिले आणि मला तिथून पिटाळून लावले.
काही वर्षानंतर मी कॉलेजला प्रवेश घेतला. त्यानंतर त्यावेळी कॉलेजातील अंकुश नावाचा मित्र रोज तबला वाजविण्याचा रियाज करतो म्हणून कळाल्यानंतर तर मी त्यालाही मला तबळा शिकव म्हणून त्याच्या मागे लागलो. तसेच उस्ताद झाकिर हुसैन यांच्या क्लासचा पत्ता दे मला त्यांच्याकडे शिकायला जाईन म्हणून त्याच्या मागे तगादा लावला. पण त्यावेळी आता सारखी सर्व साधने नसल्याने म्हणा किवा काही अडचणीमुळे म्हणा त्याला उस्ताद झाकिर हुसैन यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या तबला शिकण्याच्या वर्गाचा मुंबईतील पत्ता काही मिळू शकला नाही. पण उस्ताद झाकिर हुसैन यांना वाजवताना पाहून किंवा असेच कधीतरी तबला वाजवतानाचा फोटो पाहून त्यांच्या सारखा तबला आपल्यालाही वाजविता यावा म्हणून अनेकांनी तबला वाजविण्याच्या कलेत प्राविण्य मिळविण्याचा प्रयत्न केला.
असो, नंतर पत्रकारीतेचे क्षेत्र निवडल्यानंतर आणि मुंबईतील स्ट्रगलिंग लाईफ सुरुअसताना कधी तरी उस्ताद झाकिर हुसैन यांच्या तबल्याचा लाईव्ह कार्यक्रम ऐकायला जावू मनाशी खूण गाठ बांधली, नंतर त्यांच्या कार्यक्रमाची वाट पाहू लागलो, नंतर त्यांच्या कार्यक्रमाची एक जाहिरात मला पाह्यला मिळाली, पण त्या कार्यक्रमाच्या तिकिटाचे दर पाहून मी स्ट्रगलिंगच्या दिवसात कार्यक्रम काही पाहणे झाले नाही. पण त्यांच्या कार्यक्रमाचा एखादा व्हिडीओ पाह्यला मिळाला तर तो आवर्जून आजही पाहतोच.
तर आम्ही विमानतळावर चेक इनच्या लाईनमध्ये असताना दोन व्यक्ती माझ्यापुढे होत्या, एक पोर सवदा तरूण आणि एक उंच थोड्याशा कुरळ्या केसांचा व्यक्ती, मी न राहवून त्यांना वेगवेगळ्या कोनातून पाहत होतो हे तेच आहेत का? म्हणून पण ते तर त्यांचे बंधू तौफिक होते. कारण काही दिवसांपूर्वी प्रभादेवी येथील नाट्यगृहात तौफिक हुसैन यांचा एक कार्यक्रम लाईव्ह पाहिला होता, त्यांचीही वाद्य वाजविण्याची कला पाहून मी भाराहुन गेलो होतो. शेवटी त्यांना मी न राहवल्याने मी विचारलं की,तुम्ही उस्ताद यांचे भाऊ तौफिक सर आहात ना, कसे आहेत उस्ताद, त्यावेळी तौफिक सर यांनी फारच प्रांजळपणे सांगितले ते वरच्या मजल्यावर वेटिंगमध्ये बसले आहेत, मी विचारले की, मी त्यांना भेटू शकतो, त्यावर तौफिक सर यांनी अगदी खुले पणाने सांगितले, आमची फ्लाईट दोन तास लेट आहे वरच्या लॉबी आहेत भेटायचं असेल तर तुम्ही भेटू शकता, त्यावेळी पहिल्यांदा जाणीव झाली, त्यांच्या बोलण्यातील नम्रपणाची आणि आदब सांभाळण्याच्या संस्काराची. आमच्याही विमानाला काही मिनिटांचा अवकाश होता, म्हणून मी तौफिक सरांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहचून उस्ताद झाकिर हुसैन यांना भेटण्यासाठी विमानतळाच्या पहिल्या मजल्यावर पोहोचलो, तेथे उस्ताद झाकिर हुसैन त्यांच्या सोबत त्यांचे वादक सोबती, तौफिक सर होतेच, पण एखाद्यामुळे आपली छाती कशी दडपून जाते, आणि त्यांच्यासमोर बोलायचं काय असा प्रश्न पडतो, त्या दडपणाखालीच मी पहिल्या मजल्यावरून फक्त उस्ताद झाकिर हुसैन यांना पाहुन परतलो आणि आमची भेट अर्धवटच राहिली.
उस्ताद झाकिर हुसैन यांची प्रकृती अत्यवस्थ आहे आणि त्यांना सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त ऐकल्यानंतर तर ती अर्धवट भेट पूर्ण करायला हवी होती असे आता सारखे-सारखे राहुन वाटतेय, पण राहिलेली अर्धवट भेट पूर्ण होण्यासाठी तरी उस्ताद झाकिर हुसैन परततील असे रात्रभर वाटत होते. पण उस्ताद आता कधीच परतणार नाहीत, त्यांच्यामुळे तबला ही अबोल झाल्याची जाणीव पहिल्यांदाच माझ्या सारख्या सुरांची ओळख नसलेल्या आणि कानसेन म्हणून असलेल्यासाठीच इच्छा चाहत्यांची इच्छा अखेर अधुरीच राहून गेली.
-गिरिराज सावंत
gsawant2001@yahoo.co.in
Marathi e-Batmya