मराठी ई-बातम्या टीम
दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही आता रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यु लावण्याबाबत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात राज्य सरकारला चांगल्यापैकी यश आल्याने आणि लसीकरणाची मोहिम मोठ्या प्रमाणावर चालविण्यात आल्याने सणासुदीच्या कालावधीनंतरही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमीच राहीले आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथील केले. यापार्श्वभूमीवर राज्यातर्गंत व्यवहार पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र आता कोरोनाचा नवा अवतार असलेल्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार वेगाने सुरु झाला आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात १ आढळून आलेला होता. मात्र दोनच दिवसात ही संख्या १० वर पोहोचली. त्यामुळे या विषाणूचा आणखी प्रसार होवू नये यादृष्टीने राज्यात सुरुवातीला नाईट कर्फ्यु लावण्याबाबत सकारात्मक पध्दतीने चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
तुर्तास या विषाणूमुळे कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीयस्तरावर जरी नसली तर या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून येत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय वाहतूक रोखण्याच्यादृष्टीकोनातून केंद्र सरकारकडूनही अद्याप कोणताही तयारी झालेली नाही. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याने ती आणखी नियंत्रणात ठेवण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारकडूनही या महिन्यातील ओमायक्रॉनची परिस्थिती पाहून जानेवारी २०२२ मध्ये पुन्हा निर्बंध जाहीर करण्याच्या हालचाली सुरु आहेत. संपूर्ण देशभरात ओमायक्रोन रूग्णांची संख्या वाढल्यास केंद्र सरकारकडून पुन्हा लॉकडाऊन किंवा अनेक गोष्टींवर निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्यातही खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टींबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून नाईट कर्फ्यु लागू करण्याचा विचार असून साधारणतः आठवडाभरात यासंदर्भातील अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे अन्य एका मंत्र्याने सांगितले.
Marathi e-Batmya