अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने गहु, हरभरा, ज्वारी, कांदा व रब्बी हंगामामधील फळ पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक फटका बुलढाणा, अमरावती व जालना जिल्ह्याला बसल्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.

शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे  विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे तसेच काढणी झालेल्या शेती मालाचे नुकसान झाले. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश काल कृषीमंत्र्यांनी दिले होते. काल या बाधित जिल्ह्यामध्ये कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन व कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, शिरुर या तीन तालुक्यातील ४२ गावातील १० हजार ६३२ हेक्टर क्षेत्रातील पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला याचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद, मंठा, जालना, परतूर, अंबड या पाच तालुक्यातील १७५ गावांमधील ३२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू व जिंतूर तालुक्यांमधील २३ गावातील ३ हजार ५९५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत. जालना व परभणी जिल्ह्यातही रब्बी ज्वारी, हरभरा, फळपिके, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, मुक्ताईनगर या तीन तालुक्यातील ३८ गावांचा समावेश असून २ हजार ४९५ हेक्टर क्षेत्रावरील केळी, मका, गहु, कांदा व हरभऱ्याचे नुकसान झाले.

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बुलढाणा जिल्ह्याला बसला असून चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदूर, मेहेकर, लोणार, सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या १० तालुक्यातील २८६ गावांमधील ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील हरभरा, गहु, कांदा, फळ व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजणगाव सुरजी व चिखलदरा या आठ तालुक्यातील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी, अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील १०१ गावांमधील ४ हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील ८ हजार ५०९ हेक्टर क्षैत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर आणि चाकूर या पाच तालुक्यामधील ५९ गावातील २ हजार ६७९ क्षेत्रावरील ज्वारी, गहु, हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. उमरगा व उस्मानाबाद या दोन तालुक्यातील २६ गावांमधील ५८३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औढा या दोन तालुक्यातील ३० गावांमधील १४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण १०८६ गावातील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानाचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

किटकनाशके साठा व विक्री, घरगुती किटकनाशके विक्री परवाना घेणे बंधनकारक पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स साठीही परवाना आवश्यक

कृषी विभागाकडून मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किटकनाशके साठा विक्री व घरगुती किटकनाशके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *