अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. या अटकेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्य सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात कायदेशीर अडचण निर्माण होईल असे भाकीत करत राजीनामा घ्यावा लागेल अशी मागणी केली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्यासोबत अख्खं सरकार उभं राहत असल्याचा संदेश देशभरात जाईल, अशी उपरोधिक टीका करत ते पुढे म्हणाले की, अतिशय चुकीचा पायंडा पाडला जात आहे. त्यांना कुठल्याही राजकीय गुन्ह्यात अटक झालेली नाही. तर टेरर फंडिंग संबंधित गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने एफआयआर केलाय, ईडीने मनी लॉन्ड्रिंगमध्ये अटक केलीय. अशा परिस्थितीत एक मंत्री राजीनामा देणार नसतील आणि सरकार म्हणत असेल की आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही, तर एक संविधानिक परिस्थिती या ठिकाणी तयार होते. पण मी त्यावर बोलणार नाही. मी एवढंच सांगेन की देशात याचा चुकीचा संदेश जाईल. दाऊदसोबत व्यवहार करणाऱ्याच्या पाठीशी सरकार उभं राहत असल्याचा संदेश यातून जाईल, असे ते म्हणाले.
विशेष म्हणजे नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना बीकेसीत आढळून आलेल्या साडेसात कोटीच्या बनावट नोटांचे प्रकरण दाबण्यात आले. तसेच यातील महत्वाच्या आरोपींना अटक केली नसल्याचा आरोप करत फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या त्या कथित व्हिडिओला एका ड्रग्ज पेडलरने फायनान्स केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी करत त्या ड्रग्ज पेडलर आणि अमृता फडणवीस याचा एक फोटो आणि व्हिडिओच्या क्रेडीट लाईनवर असलेले नाव उघडकीस आणत फडणवीस पती-पत्नींना संशयाच्या भोवऱ्यात उभे केले.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी कुर्ला येथील खरेदी केलेल्या जागीचे व्यवहार आणि त्या मागचा इतिहास उघडकीस आणत मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीकडून ती जमिन खरेदी केल्याचे उघडकीस आणले. तसेच ही कागदपत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय तपास यंत्रणाकडे पाठविली होती. त्यानंतर दोन तीन महिन्याचा कालावधी गेल्यानंतर या अनुषंगाने तपासास सुरुवात होवून अखेर नवाब मलिक यांना आज सुरुवातीला ताब्यात घेतले आणि दुपारी अटक करत त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावर न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्च पर्यत ईडीची कोठडी सुणावली आहे.
Marathi e-Batmya