Breaking News

महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा

राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली.

भाजपच्या या बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अधिक आमदार निवडून येऊ नये अशी मनशा भारतीय जनता पार्टीची आहे व त्यासाठी ते रणनीती तयार करत आहे. छातीवर मोठा दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री पद बहाल केले हे एका भाजपा नेत्याच्या वक्तव्याची आठवणही यावेळी करून दिली.
महेश तपासे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभेतील निवडणुकीच्या अपयशाचे खापर भाजपा व आरएसएस ने या अगोदरच अजित पवार यांच्यावर फोडले आहे व त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला भाजपा किंमत देत नाही असा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले की, भाजपाकडे मुख्यमंत्री पदाकरिता चेहरा नाही आणि त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं श्रेय शिंदे व पवार यांनी लाटले. भाजपाला काहीच फायदा होत नसल्याचे चित्र समोर आल्यामुळे भाजपा नेते नाराज आहेत. दुसरीकडे, शिंदे व अजित पवार यांची मतं भाजपाला ट्रान्सफर होत नाहीत हे भाजपा ओळखून असल्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्यावरील भाजपाचे प्रेम पुतना मावशीचं असून याची प्रचिती या दोघांना निवडणूक काळात येईल, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत