विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राज्यात सध्या सर्वच राजकिय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. त्यामुळे प्रचारसभांमधून सर्वच राजकिय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलुंड येथील जाहिर सभेत बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना उद्देशून एक वक्तव्य करत शांत बसतोय म्हणून चुकीचा अर्थ काढू नको नाहीतर आम्ही ठाकरे आहोत हे विसरू नको असा इशारा दिला. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर देत जर तुम्ही ठाकरे असाल तरी मी बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला संजय राऊत आहे असे सांगत ते सध्या भाजपाच्या नादी लागलेले आहेत. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने दिलेली स्क्रिप्ट वाचून बोलत असावेत असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, महायुतीला निवडणूकीत विजयी करण्यासाठी सध्या राज्यात पोलिस आणि गुंड टोळ्यांच्या बैठका सुरु असल्याचा गंभीर आरोप करत सरकार बदलल्यावर या सगळ्यांचा हिशोब केला जाईल असा इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी मुंबईतील अनेक मतदारसंघात आणि ठाणे व पुण्यातील मतदारसंघात अनेक कुप्रसिद्ध गुन्हेगार काम करत आहेत. कधीकाळी टोळ्यांमध्ये सहभागी असलेले लोक भाजपा आणि शिंदे यांच्यासाठी काम करत आहेत. राजकिय पक्ष वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक निरिक्षकांची नेमणूक करतात, त्याधर्तीवर भाजपा आणि शिंदेंनी गुंडांच्या टोळ्या नेमल्या आहेत. आपले जसे संपर्क प्रमुख असतात तसे त्यांनी टोळ्यांचे म्होरके नेमलेले आहेत. कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, मुलुंड, दादर, ठाणे, कोपरी, पाचपाखाडी, ठाणे शहर, कलिना, कुर्ला भागात हे गुंड व त्यांच्या टोळ्या निवडणूकीचं काम करत आहेत. त्यासाठी या गुन्हेगारांना जामीनावर बाहेर आणण्यात आलं असून त्यांना शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश दिल्याचा आरोपही यावेळी केला.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि गुंडाच्या बैठका होत असून आयपीएस दर्जाचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि विविध मतदारसंघातील गुंडाच्या टोळ्यासोबत या बैठका होत आहे. आम्ही यासंदर्भात निवडणूक आयोगाला आम्ही लवकरच माहिती देणार आहोत. हे पोलिस महाविकास आघाडीला मदत करणारे कार्यकर्त्ये तसेच ज्यांच्यावर राजकिय गुन्हे आहेत त्यांना तडीपार करतात. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे त्यांना धमक्या द्यायच्या असे सगळे पराक्रम सुरु असल्याचा आरोपही यावेळी केला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी एका पोलिस अधिकाऱ्याचे नाव घेत म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना माझं थेट आव्हान आहे की, तुम्ही थेट एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार बदलंत असत, सरकार जातं येतं, गुंडांच्या मदतीने तुम्ही ज्या कोणाला मदत करू इच्छिता त्यांचेही दिवस फिरतील. तुम्ही पोलिस खात्याला कलंक लावत आहात, मुंबई आणि महाराष्ट्राचं पोलिस खातं तुम्ही बेअब्रु करत आहात. सत्यनारायण चौधरी तुम्ही कायदा व सुव्यवस्थेचे विभागाचे प्रमुख आहात, मात्र तुमच्यासमोर जे जळतंय ते पहा, आम्हाला जास्त बोलायला लावू नका असा सूचक इशारा देत सरकार बदलत आहे. कोणता अधिकारी कोणत्या गुंडाबरोबर बैठक घेतोय याची माहिती जर मला मागितली तर मी ती गुंडाची यादी द्यायला तयार आहे असे सांगत वर्षा बंगल्यावरून कोणत्या सूचना दिल्या जातायत हे मी सांगू शकतो. सत्यनारायण चौधरी कोणासाठी काम करतायत त्यांची नावं देऊ का मला धमक्या देऊ नका असा इशाराही यावेळी दिला.
Marathi e-Batmya