मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर या रुग्णालयात दाखल असल्यामळे त्या त्यांच्या निवासस्थानी नव्हत्या. म्हणून त्यांना समन्स बजावता आले नाही, असे राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी मुंबईतील विशेष न्यायालयात माहिती देताना सांगितले.
प्रज्ञासिंह ठाकूर यांची तब्येत खालावली असून मागील दोन महिन्यांपासून त्या रुग्णालयात दाखल आहेत तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे प्रज्ञासिंह यांना सन्मस देता आले नसल्याची माहितीही एनआयएकडून न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी याचिकेवरील सुनावणी ३० डिसेंबर रोजी ठेवली. उल्लेखनीय बाब म्हणजे, प्रज्ञासिंह यांना समन्स देऊ न शकल्याची ही पहिलीच वेळ नाही. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अंतिम सुनावणीदरम्यान प्रज्ञासिंह यांची नेहमीची अनुपस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने १३ नोव्हेंबरला वॉरंट बजावले होते. परंतु, प्रज्ञा त्या निवासी पत्त्यावर राहत नसल्याचे एनआयएने सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले होते.
२९ सप्टेंबर २००८ रोजी उत्तर महाराष्ट्रातील मुंबईपासून सुमारे २०० किमी अंतरावर असलेल्या मालेगाव येथील मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. कायदा कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत खटल्यात सात आरोपींमध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि माजी भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हे प्रमुख असून मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांच्यावर खटला चालविण्यात आला.
Marathi e-Batmya