८५ व्या वर्षाच्या तरूणाने दिल्लीच्या वर्तुळात पुन्हा आणले चर्चांचे उधाण निवडणूकीत कमी जागा मिळाल्या तरी राजकीय महत्व दाखविण्यात यश

महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी मुंबईऐवजी नागपूरात जाणे पसंत केले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत गेलेले बहुतांशी आमदार शरद पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी नागपूरातील हॉटेल्सवर पोहोचले. मात्र या वयातही आणि संशयातीत पराभव होऊनही शरद पवार यांच्याकडून आजही दिल्लीच्या वर्तुळात चर्चा घडवून आणत पुन्हा एकदा राजकिय पटलावर वेगळाच खेळ मांडण्याची नवी शक्यता निर्माण केली आहे.

वास्तविक पाहता दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असून दररोज संसदेत राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात आणण्यात येणाऱ्या अविश्वासदर्शक ठरवावरील चर्चा आणि लोकसभा-राज्यसभेत अमेरिकेने गौतम अदानीच्या विरोधात जारी केलेले अटक वारंटच्या मुद्यावर चर्चेची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. मात्र काँग्रेसच्या मागणीला सत्ताधारी भाजपाकडून वाटाण्याच्या अक्षता लावत अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरस आणि सोनिया गांधी यांच्यातील आर्थिक संबधाचा मुद्दा पुढे करत आहेत. त्यामुळे संसदेत मागील काही दिवसांपासून चर्चांऐवजी गोंधळामुळेच संसदेचे कामकाज स्थगित होत आहे.

त्यामुळे दिल्लीतील थंडीच्या कडाक्यातही राजकिय चर्चांची गर्मी जरा जास्त आहे. पण या गर्मीत दिल्लीच्या सत्ता वर्तुळात मोदी-शाह यांच्या सत्तेची दहशतची जास्त ऊब असल्याची चर्चा दिल्लीत जास्त असल्याचे बोलले जात आहे.
या निमित्ताने आपल्या वाढदिनाचे औचित्य साधत वाढदिनी मुंबईत असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी यावेळी बऱ्याच कालावधीनंतर मुंबई-पुणे-बारामती ऐवजी पहिल्यांदाच दिल्लीत राहणे पसंत केले. लोकसभा निवडणूकीत पुतण्या अजित पवार यांच्यापेक्षा राजकिय वर्चस्व जास्त असल्याचे दाखवून दिल्यानंतर, विधानसभा निवडणूकीत अजित पवार यांनी भाजपाच्या मदतीने आपला करिष्मा दाखवून दिला. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. तरीही दिल्लीत वाढदिनाचे औचित्य साधत शरद पवार हे थांबून राहिल्याने आज सकाळी सकाळी त्यांचे पुतणे तथा त्यांच्या नेतृत्वाच्या विरोधात सवतासुभा मांडलेले अजित पवार हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांसह आणि कुटुंब कबिल्यासह शरद पवार यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचे अभिष्टचिंतन करून आशिर्वादही घेतला.

अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते तडक भाजपाचे श्रेष्ठी तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी तसाच लवाजमा घेऊन त्यांच्या कार्यालयात गेले. तेथे काही काळ चर्चा झाली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती पुढे आली नसली तरी. दुपारनंतर ऐरवी कोणाच्या घरी राजकिय कारणाशिवाय न जाणारे अमित शाह मात्र वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी शरद पवार यांच्या घरी पोहचले.
त्यामुळे शरद पवार यांची दिल्लीतील नुसती उपस्थितीही पुन्हा बातम्यांची निर्मिती करणाऱ्या घटना घडत राहिल्याने आजचा दिवस शरद पवार यांचा बंगला महाराष्ट्रातील माध्यमांसह राष्ट्रीय माध्यमांसाठी केंद्र बनला आहे. राजकिय वर्तुळात उभी ह्यात घालविल्यानंतरही अशा पद्धतीने स्वतःच्या वाढदिवसाची आणि राजकिय नेत्यांच्या भेटीच्या चर्चेची कोणतेही सत्तेचे पद नसताना आणि निवडणूकीच्या रिंगणात दारूण पराभव झालेला असतानाही अशा पद्धतीची स्वतःचे राजकिय महत्व आणि अस्तित्व दाखवून देणे प्रत्येकालाच शक्य नाही. त्यामुळेच ८५ वर्षाच्या तरूणाने वाढदिनानिमित्त दिल्लीच्या राजकिय वर्तुळात उपस्थितीची जाणीव चर्चेच्या माध्यमातून दाखवून देणारे शरद पवार हे राज्यासह देशाच्या राजकारणात महत्वाचे राजकिय व्यक्तीमत्व असल्याचे दिसून आले आहे.

About Editor

Check Also

निवडणूक आयोगाकडून फाल्टा मतदारसंघात फेरमतदान निवडणूक गैरप्रकार आणि लोकशाही प्रक्रियेचा भंग झाल्याने पुर्नमतदान

भारतीय निवडणूक आयोगाने शनिवारी पश्चिम बंगालच्या फाल्टा विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर फेरमतदान घेण्याचे आदेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *