बाल संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’, ‘बालस्नेही पुरस्कार’ची घोषणा महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड्. सुशीबेन शहा यांची माहिती

बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ हे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून हे उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती आज महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड्. सुशीबेन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सतत प्रयत्नशील आहे. याच दिशेने आयोगाने ‘बालरक्षा अभियान’ हा व्यापक जनजागृती उपक्रम हाती घेतला आहे. बालकांचा बहुतांश वेळ शाळेत जातो, त्यामुळे शाळा, शालेय वाहतूक, सायबर सुरक्षितता यासंबंधी आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, बालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले कायदे, बालकांबाबत अनुचित घटना घडल्यास करावयाची कार्यवाही व संबंधित यंत्रणांची माहिती शिक्षक, पालक आणि समाजाला पुरवणे गरजेचे आहे. या अनुषंगाने अभियानाचा शुभारंभ १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता, सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी ‘बालरक्षा अभियान’ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या माहितीपर पोस्टर्सचे अनावरण, बालकांच्या तक्रार निवारणासाठी विकसित व सुधारित ‘बालस्नेही चिराग ॲप’ लाँच केले जाणार आहे.

फेब्रुवारी व मार्च २०२५ या कालावधीत हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,नागपूर, अकोला, नाशिक,पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात १५० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्यात शिक्षक, पालक, पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी व निवडक विद्यार्थी यांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण ७,००० जणांना बाल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे उद्देश बालकांच्या सुरक्षिततेविषयी शिक्षक व पालकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शालेय वातावरण अधिक सुरक्षित बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करणे असे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने ‘बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा, संस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय ‘बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बाल विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, महिला आणि बाल विकास विभाग राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री योगेश कदम प्रमुख उपस्थित असणार आहेत. या पुरस्कारात बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी भरीव कार्य करणाऱ्या जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), जिल्हा पोलीस अधीक्षक, महिला व बालविकास विभाग, पोलीस विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील अधिकारी व संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेच, बालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, हे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.

सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेत, त्याचे विवरण खालील प्रमाणे –

– महसूल विभाग: ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी

– पोलीस विभाग: जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी

– शालेय शिक्षण विभाग: प्रत्येक महसूली विभागातून १ शाळा, अशा ६ शाळांचा गौरव

– महिला व बालविकास विभाग: एकूण ९८ अधिकारी व कर्मचारी, तसेच संस्था यांना सन्मान

About Editor

Check Also

Nagpur Blast

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, स्फोटक कारखान्यांसाठी नियमांमध्ये सुधारणासाठी केंद्राकडे निवेदन स्फोटक कारखान्यातील अपघात टाळण्यासाठी प्रक्रिया ऑटोमेशनवर भर

स्फोटक पदार्थ हाताळण्याच्या प्रक्रियेत ऑटोमेशनवर आधारित उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *