अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरी झालेल्या हल्ल्यामध्ये त्याच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा, घटनास्थळी सापडलेला एक तुकडा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून हस्तगत केलेल्या शस्त्राशी जुळत आहेत. हे तीन तुकडे अभिनेत्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा भाग होते, असे पोलिसांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात सांगितले. तसेच पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध केला.
तिन्ही तुकडे मुंबईतील कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये सीए (रासायनिक विश्लेषण) तपासणीसाठी पाठवण्यात आले. एफएसएल अहवालानुसार, हे तिन्ही तुकडे एकाच चाकूचे भाग आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे. हा अर्जदार आरोपीविरुद्धचा ठोस पुरावा असून त्यावरूनच त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही शरीफुल इस्लामच्या जामीन अर्जाला विरोध करताना पोलिसांनी नमूद केले. गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे आहेत. तसेच आरोपी हा भारतात बेकायदेशीररित्या राहणारा बांगलादेशी नागरिक आहे. त्याला जामीन दिल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. जामिनावर सुटका झाली तर तो तक्रारदार आणि साक्षीदारांना प्रभावित करू शकतो, भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे वारंवार करत राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही, हा असेही पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध करताना म्हटले आहे.
काय आहे आरोपीचा दावा
आपल्याविरोधात दाखल गुन्हा पूर्णपणे खोटा असून आपली अटकही बेकायदेशीर असल्याचा दावा शहजादने अर्जात केला आहे. पोलिसांनी आपल्याला कायद्यानुसार अटकेची कारणे सांगितली नसल्यामुळे आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा अर्जातून शहजादने केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आवश्यक सर्व पुरावे गोळा केले असून तपास जवळजवळ पूर्ण झाला आहे आणि फक्त आरोपपत्र दाखल करणे बाकी आहे. आपण तपासात पोलिसांना सहकार्य केले आहे. त्यामुळे आपल्याला आणखी कोठडीत ठेवून कोणताही हेतू साध्य होणार नसल्याचा दावाही अर्जात केला आहे.
काय प्रकरण
जानेवारी महिन्यात वांद्रे येथील १२ व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये एका घुसखोराने अभिनेता सैफ अली खानवर (५४) चाकूने अनेकदा वार केले होते. त्यानंतर सेफवर लीलावती रुग्णालयात आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी शरीफुलला अटक केली होती. दुसरीकडे, शरीफुलच्या अटकेदरम्यान, त्याच्या वडिलांनी अटक चुकीची असल्याचा दावा केला होता. तसेच सेफ अली खानच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा मुलगा त्यांचा नसल्याचा दावाही केला होता. तथापि, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला होता.
Marathi e-Batmya