संजय राऊत म्हणाले की, खरातावरील कारवाई कौतुकास्पद, आता चाकणकरांवर कारवाई करा शिवसेना उबाठाचे संजय राऊत यांनी केली मागणी

भोंदुबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर मुख्यमंत्र्यांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. आता रुपाली चाकणकर यांच्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. भोंदु प्रकरणाची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहखात्याच्या माध्यमातून जी मोहिम राबवली, त्यासंदर्भातील माहिती आता समोर येत आहे. या महाराष्ट्राला कलंकित करणारी, बदनाम करणारी अशी कृत्ये, त्याचे सूत्रधार आणि त्यांना राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा देणारे पुढारी, मंत्री या सगळ्यांचे धाबे मुख्यमंत्र्यांच्या कारवाईमुळे दणाणले आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांवर नेहमी टीका करतो, कालही आम्ही याप्रकरणात त्यांच्यावर टीका केली. पण जसजशी माहिती समोर येत आहे. त्यानुसार गेल्या १५ दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे मुख्यमंत्र्यांनी खरात फाईल्स संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते आणि पोलिसांची पथके काम करत होती. ते ऑपरेशन यशस्वी झालं. मुख्यमंत्र्यांनी याबाबत साफसफाई सुरू केली असेल तर ते कौतुकास पात्र आहेत, असेही सांगितले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरात याच्यावर असल्याचेही यावेळी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, अशोक खरात हा फडणवीसांच्या कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचे गुरूमहाराज आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह क्लिप्स सापडल्या आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील अर्धे मंत्री तणावाखाली आहेत. काही लोकांना तर आयसीयूमध्ये भरती कराव लागले आहे, अशी माहिती समोर येत आहे. या भोंदूबाबाने पोलिसांना जी माहिती दिली आहे, ती अत्यंत गोपनीय असली तरी महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रीमंडळातील ९ मंत्री हे या भोंदूबाबाचे नियमित भक्त होते. त्यांच्याकडे जाऊन अत्यंत घृणास्पद विधी करत होते, असे सांगत सरकारवर टीका केली.

भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र सोडले जात आहे. संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करताना म्हणाले की, हा विषय फक्त महिला आयोगाच्या अध्यक्षांपुरता मर्यादित नाही. याप्रकरणात मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, काही महत्वाचे नेते आहेत, यांचाही विचार केला पाहिजे. महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर जावेच लागेल, त्यांना घालवण्यात मुख्यमंत्री कमी पडले तर ते राज्याचं दुर्दैव ठरेल, अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे आव्हान, गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागा महापौर रितु तावडे यांना खासदार वर्षा गायकवाड यांचे आव्हान

मुंबईच्या महापौरांची जबाबदारी वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरवण्याची आहे पण त्या सतत बांगलादेशींबद्दल बोलत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *