मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींची विकास कामे होणार सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही

प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य व अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे करण्यात येत आहेत. भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप तपोवनातील श्री स्वामी नारायण मंदिर येथे झाला.

त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज, संत निवृत्ती महाराज, रावसाहेब महाराज गोसावी, पुरुषोत्तम महाराज देहूकर, अशोक तिवारी, श्री यतिंद्रानंद गिरीजी महाराज, जनार्दनहरी महाराज, स्वामी संविदानंद सरस्वती, जितेंद्रानंद स्वामी, ब्रह्मेशनंद महाराज, राजेंद्र दास, महंत दुर्गादास महाराज, भक्तिचरणदास महाराज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकास कामे सुरू आहेत. साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, तसेच कुंभमेळ्याकरीता प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या सूक्ष्म आणि नेटक्या नियोजनासाठी नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा केला होता. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. विकासकामे करतांना साधू, महंत आणि आखाड्यांकडून आलेल्या सूचनांचाही स्वीकार करण्यात येईल, असेही सांगितले.

संत शक्ती ही सज्जनशक्ती असून साधू संतांनी भारतीय संस्कृती टिकवून ठेवल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगातील अन्य संस्कृती नामशेष होत असताना भारतीय संस्कृती टिकून राहिली. ही प्राचीन असण्यासोबतच नित्यनूतनही आहे. हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. साधू संतांनी या प्रवाहातील वाईट बाबी बाजूल्या सारल्याने संस्कृतीची निरंतरता टिकून आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायानेदेखील अनेक आक्रमणांना सामोरे जात वारीची परंपरा टिकवून ठेवली. हीच परंपरा कुंभमेळ्यात प्रतिबिंबीत होते.

शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कुंभमेळा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वात मोठा सोहळा आहे. मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा हा सोहळा आहे. विचारांच्या प्रदूषणाला दूर सारून भारतीय संस्कृतीला प्रवाहीत करण्याचे हे पर्व आहे. या सोहळ्यात सर्व जाती-धर्माचे भाविक सहभागी होत असल्याने कुंभमेळा हा राष्ट्रीय एकात्मतेचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असेही त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यात केवळ पवित्र स्नान होत नाही, तर साधू – संतांचे मार्गदर्शन, विचारांचे आदान- प्रदान होत असल्याने पुढील वर्षी होणारा कुंभमेळा अविस्मरणीय होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे समाजातील गैरप्रकारांना आळा बसेल तसेच भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी अविचल देवाचार्य, जितेंद्रानंद स्वामी, रवींद्रपुरी महाराज, तुषार भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप, माजी आमदार बाळासाहेब सानप, महानगरपालिकेचे नगरसेवक यांच्यासह देशभरातून आलेले साधू, संत, महंत उपस्थित होते.

About Editor

Check Also

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर, ती आपण पार पाडणार सुनेत्रा पवार यांच्या बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्याबाबत केले भाष्य

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *