गिरीष महाजन यांची माहिती, अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनांची चौकशी होणार नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे नुकसान अशा घटना घडत असून, अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत,नागरिकांनी सतर्क रहावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे ही नैसर्गिक आपत्ती असून, ज्या ठिकाणी बोगदे, रस्ते किंवा इतर ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत, त्या सर्व घटनांची चौकशी केली जाईल. राज्यभरात; तसेच मुंबई महानगरपालिकेकडून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. झाडांच्या छाटणीसह धोकादायक ठिकाणांवर मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य यंत्रणा सतर्क आहे.

पुढे बोलताना गिरीष महाजन म्हणाले की, राज्यात काही भागांत विक्रमी पाऊस झाला असून, विशेषतः मुंबई, रायगड आणि कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.  त्यामध्ये मानखुर्दमधील दुर्घटनेतील सहा मृत्यूंचा समावेश आहे, असे सांगितले.

गिरीष महाजन पुढे बोलताना म्हणाले की, मानखुर्द येथील दुर्घटनेनंतर आपण तातडीने घटनास्थळी भेट दिली होती. तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर होती. वर्षानुवर्षे धोकादायक अवस्थेत असलेल्या परिसरात नागरिक वास्तव्यास असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. धोकादायक इमारती खाली करण्यासाठी नोटिसा दिल्यानंतरही पर्यायी निवासाचा प्रश्न निर्माण होत असल्याने अनेक नागरिक स्थलांतरास तयार होत नाहीत. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी परस्पर सहकार्य करणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

शेवटी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, खाजगी कार्यालयांनी शक्य असल्यास ‘वर्क फॉर्म होम’चा अवलंब करावा आणि परिस्थितीनुसार शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनाबाबत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सविस्तर निवेदन करतील, असेही स्पष्ट केले.

तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अतिवृष्टीने सर्व जणांनी सतर्क राहून शासनाला मदत करावी. राज्यातील अतिवृष्टीची परिस्थिती पाहता आजचे कामकाज स्थगित करत असल्याचे जाहिर केले.

About Editor

Check Also

सुप्रिया सुळे यांचा आरोप, एकाच पावसाने महाराष्ट्र पॅरालाइज झाला ! मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यात आणीबाणी जाहीर करावी

मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून, मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *