कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, शेतकरी हाच तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू कृषी क्षेत्रातील एआय अ‍ॅप्सचे लोकार्पण व सामंजस्य करार

आजचा काळ तंत्रज्ञानाचा असला तरी कृषी क्षेत्राच्या तंत्रज्ञानात शेतकरी हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, आयओटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडल्यास महाराष्ट्राची शेती देशासह जगासाठी आदर्श ठरू शकते, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, महाराष्ट्राने २०२५ ते २०२९ या कालावधीसाठी एआय आधारित कृषी धोरण राबवून देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासाठी सुमारे ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘महाविस्तार’ अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत वैयक्तिक सल्ला, बाजारभाव, हवामान माहिती आणि विविध योजनांचे मार्गदर्शन केले जात आहे. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले आहे.

एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अन्नसुरक्षा, हवामान बदलाशी सामना, महिला सशक्तीकरण आणि शाश्वत शेती साध्य करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. तसेच, एआय अँड ॲग्रीटेक इनोव्हशन सेंटर स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांपर्यंत एआय आधारित सेवा पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. आजचा शेतकरी केवळ कुटुंबापुरता मर्यादित न राहता देश आणि जगाच्या अन्नसुरक्षेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगून एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे जीवन अधिक सक्षम, सुरक्षित आणि समृद्ध होईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील एआय अ‍ॅप्सचे लोकार्पण व सामंजस्य करार

राज्यातील शेती क्षेत्र हे अधिक आधुनिक, तंत्रज्ञानस्नेही आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त करण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित महत्वपूर्ण अ‍ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

यामध्ये महा एजी एक्स (महा-अ‍ॅग्री डेटा एक्स्चेंज) हा राज्याचा महत्वकांक्षी डेटा प्लॅटफॉर्म असून, कृषी क्षेत्रातील माहिती सुरक्षित पद्धतीने एकत्रित करून संशोधन, नवोन्मेष आणि धोरणात्मक निर्णयांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणार आहे. हा प्लॅटफॉर्म नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून विकसित करण्यात आला आहे.

तसेच भीली आदिवासी भाषेसाठी लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) लाँच करण्यात आले असून, स्थानिक आदिवासी भाषेत कृषी विषयक माहिती आणि सल्ला उपलब्ध करून देण्याचा हा पहिला प्रयत्न आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली, भाषिणी आणि एक-स्टेप संस्थेच्या सहकार्याने हे मॉडेल विकसित करण्यात आले आहे.

याशिवाय महाविस्तार (MahaVISTAAR) व्हॉइस टेलिफोनी अ‍ॅप सादर करण्यात आले. स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांनाही फोनद्वारे शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे मिळावीत, हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे.

महाविस्तार (MahaVISTAAR) एआय आधारित कीड व रोग ओळख प्रणाली देखील यावेळी सादर करण्यात आली. पिकांच्या छायाचित्रांच्या आधारे कीड व रोग ओळखण्यास मदत करणारे हे अ‍ॅप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी

एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँक यांच्यातील महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. महाराष्ट्राच्या एआय-सक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत व्यवस्था ‘महाविस्तार’ (MahaVISTAAR) यांच्या स्थापत्य रचना (Architectural Design), प्रशासकीय व शासन चौकट (Governance Frameworks), अंमलबजावणीतील अनुभव व धडे (Implementation Lessons) तसेच मुक्त मानके (Open Standards) यांचे पद्धतशीर दस्तऐवजीकरण व संकलन करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. हा सामंजस्य करार कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे.

नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासोबत सामंजस्य करार

महाराष्ट्र शासनाच्या महा-अ‍ॅग्री एआय धोरण २०२५-२०२९ अंतर्गत नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासोबत सामंजस्य करारकरण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार आणि प्रभावी वापर वाढविण्यासाठी स्थापन केलेल्या आर्टिफिशिंअल इंटेलिजन्स फॉर अग्रीकल्चर रिसर्च या नेटवर्कमध्ये सहभागी होण्यासाठी नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशोधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. हा करार महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सहकार्य वाढविण्यास उपयुक्त ठरणार आहे.

एआय फॉर ॲग्री २०२६ ही परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, एफएओ, युएनडीपी, आयएफएडी, वर्ल्ड बँक समूह, आशियाई विकास बँक, इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी ॲरीड ट्रॉपीक्स (आयसीआरएसएटी), भारतीय विज्ञान संस्था, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन तसेच जागतिक व राष्ट्रीय भागीदारांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवे स्टार्टअप, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था यामध्ये सहभागी झाल्या आहेत.

About Editor

Check Also

संयुक्त किसान मोर्चाने मागितला पियुष गोयल यांचा राजीनामा भारत- अमेरिका व्यापारी करारावरून केली मागणी

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराचे तपशील स्पष्ट करताच, संयुक्त किसान मोर्चाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *