कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला दिल्या शुभेच्छा

कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील परदेश भेटीसाठी रवाना झालेल्या पहिल्या गटातील शेतक-यांना कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून तो अनुभव राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले.

“शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील सन २०२५-२६ या वर्षात तीन अभ्यास दौरे नियोजित आहेत. त्यामध्ये युरोप, इस्राएल आणि मलेशिया,व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १७ जानेवारी २०२६ रोजी मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या तीन देशांचा एकत्रित अभ्यासदौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यातील सहभागी शेतकऱ्यांनी पुणे येथून मुंबई मार्गे पुढे प्रस्थान केले असून, या दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, १ कृषी विभागाचा अधिकारी तसेच १ प्रवासी कंपनीचा प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.

या अभ्यास दौर्‍यामध्ये सहभागी शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, संरक्षित शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम उत्पादन तंत्रज्ञान, तसेच विविध देशांतील कृषी व्यवस्थापन व विपणन व्यवस्था यांचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग करून राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यास मदत होणार आहे. विशेष बाब म्हणजे, सन २०१९ नंतर आयोजित करण्यात आलेला हा पहिलाच परदेश अभ्यास दौरा असून कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे कृषी विभाग या उपक्रमाबाबत सकारात्मक आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.

About Editor

Check Also

केंद्रीय कृषी आयुक्त सिंग यांची माहिती, ब्रोकोलीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणार जे डब्लू मॅरियट जुहू येथे परिषदेचे उद्घाटन

केंद्र सरकार ब्रोकोलीच्या लागवड, प्रसार, पायाभूत सुविधा विकास आणि कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी समर्पित उत्कृष्टता केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *