बाजारमूल्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गंभीर फसवणूक तपास कार्यालयाने (एसएफआयओ) दाखल केलेल्या प्रकरणातून उद्योगपतीआणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि संचालक राजेश अदानी यांना उच्च न्यायालयाने सोमवारी दोषमुक्त केले.
एसएफआयओने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एइएल) आणि त्याचे प्रवर्तक गौतम अदानी आणि राजेश अदानी यांच्याविरुद्ध सुमारे ३८८ कोटींच्या बाजारमूल्य नियमन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर, २०१२ मध्ये एसएफआयओने गौतम आणि राजेश अदानी यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक केल्याच्या आरोपांप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.
तथापि, मे २०१४ मध्ये मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने अदानी बंधूंना या प्रकरणातून दोषमुक्त केले होते. एसएफआयओने या दोषमुक्ततेच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. नोव्हेंबर २०१९ मध्ये सत्र न्यायालयाने या प्रकरणी निर्णय देताना दंडाधिकाऱ्यांचे आदेश रद्द केले व अदानी बंधुना दोषमुक्त करण्यास नकार दिला. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अदानी बंधूनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती व २०१९ मध्ये उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांच्या एकलपीठाने अदानी बंधूंच्या याचिकेवर निर्णय देताना सत्र न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि दोघांनाही प्रकरणातून दोषमुक्त केले.
Marathi e-Batmya