पतंजलीला ठोठावलेल्या साडेचार कोटी रुपयांचा दंडाच्या आदेशाला स्थगिती व्यापारचिन्ह हक्क (ट्रेडमार्क) उल्लंघनाचे प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्णय

मंगलम ऑरगॅनिक्स लिमिटेडने दाखल केलेल्या व्यापारचिन्ह हक्क (ट्रेडमार्क) उल्लंघनाप्रकरणी पतंजलीला साडेचार कोटी रुपयांचा दंड भरण्याच्या उच्च न्यायालयाच्या एकलपीठाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.

यावर्षी जुलै महिन्यात उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे पतंजली आयुर्वेद लिमिटेडने हेतुत: उल्लंघन केल्याचा ठपका उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने ठेवला होता. तसेच, पतंजलीला साडेचार कोटी रुपयांचा दंड सुनावला होता. उच्च न्यायालयाच्या त्या आदेशाला न्या. ए.एस. चांदूरकर आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाने सोमवारी स्थगिती दिली. परंतु, साडेचार कोटी रुपयांच्या दंडाच्या रकमेपैकी ५० लाख रुपयांची रक्कम न्यायालयाकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण

मंगलम ऑरगॅनिक्सने पतंजलीविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेऊन कापूर उत्पादनांच्या स्वामित्व हक्कांचे उल्लंघन केल्याचा दावा केला होता. या दाव्याची दखल घेऊन न्यायालयाने ३० ऑगस्ट २०२३ रोजी पतंजलीला कापूर उत्पादने विकण्यापासून प्रतिबंध केले होते. मात्र, त्यानंतरही पतंजलीकडून कापूर उत्पादनांची विक्री सुरू असल्याचा दावा करून मंगलम ऑरगॅनिक्सने पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेऊन पतंजलीविरोधात अवमान याचिका केली होती. त्यानंतर, पतंजलीने २ जून रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाची माफी मागितली आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.

तथापि, पतंजली आयुर्वेदाचे संचालक रजनीश मिश्रा यांनी प्रतिज्ञापत्रात कंपनीने न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केल्याची बाब कबूल केली होती. न्यायालयाच्या मनाई आदेशानंतर ४९,५७,८६१ रुपयांची कापूर उत्पादने विकली गेली. तसेच, २५,९४,५०५ रुपये किमतीची कापूर उत्पादने अद्याप घाऊक विक्रेते किंवा वितरक आणि अधिकृत दुकानांत पडून असल्याचेही प्रतिज्ञापत्राद्वारे मान्य केले होते. आदेशाचे उल्लंघन केल्याच्या पतंजलीच्या कबुलीची न्यायालयाने दखल घेतली. तसेच कापूर उत्पादन विक्रीस प्रतिबंध करणाऱ्या अंतरिम आदेशाचे हेतुत: आणि जाणूनबुजून उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे न्या. रियाज छागला यांच्या एकलपीठाने पतंजलीला ५० लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. आदेशाची पायमल्ली करण्याचा पतंजलीचा हेतूबद्दल आपल्या मनात तीळमात्र शंका नसल्याचेही पतंजलीचे सर्व दावे फेटाळताना न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले होते.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ म्हणाले, ७० टक्के कैद्यांवर अद्याप गुन्हे सिद्ध नाही देवी स्क्वेअर सर्कल क्लिनिकच्या अहवालात माहिती

३६ वर्षीय वनिता देवी (नाव बदलले आहे) हिच्यावर २०१७ मध्ये तिच्या तीन आणि सहा वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *