मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकऱणी वाल्मिक कराड यांच्यासह आठ जणांवर मकोका खाली गुन्हा दाखल करण्यास काल केज न्यायालयाने अंतिम मान्यता दिली. त्यानंतर आज वाल्मिक कराड आणि इतर अन्य आरोपी यांच्यात फोन वरून झालेल्या संभाषणाच्या आधारे संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्राथमिक सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी एसआयटीने वाल्मिक कराडची १० दिवसांची पोलिस कोठडी बीड न्यायालयात मागितली. मात्र बीड न्यायालयाने वाल्मिक कराड यास ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे आता एसआयटी पथकाकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची चौकशी होणार आहे.
या हत्या प्रकरणी एसआयटीच्या वकिलांनी आणि सरकारी वकीलांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर वाल्मिक कराड याच्या वकिलांने कराडची बाजू मांडली. त्यानंतर बीड न्यायालयाने वाल्मिक कराड याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सात दिवसानंतर वाल्मिक कराडला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे म्हणाले की, सरकारी वकिलांनी वाल्मिक कराडच्या १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्याचबरोबर १५ विविध मुद्दे उपस्थित केले होते. परंतु वाल्मिक कराड यास खंडणी प्रकरणात अटक केल्यानंतर १५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती याची आठवण न्यायालयाला करुन दिली. त्या खंडणीच्या खटल्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कोणताही संबध असल्याचे दिसून आले नसल्याचे न्यायालयास सांगितले. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाने २२ जानेवारी रोजी सुनावणीची तारीख दिली आहे. त्या दिवशी न्यायालय काय निर्णय देणार हे महत्वाचं असणार आहे.
यावेळी एसआयटीच्या वकिलांनी वाल्मिक कराड याच्या विरोधात अनेक आरोप आणि अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र एसआयटीने केलेले आरोप आणि त्यांचे मुद्दे वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी फेटाळून लावले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड यास २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, वाल्मिक कराड ला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावल्यानंतर वाल्मिक कराड समर्थकांनी न्यायालयाच्या आवारातच घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर वातावरण शांत झाले.
Marathi e-Batmya