लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला शिवसेना गटाचे (उबाठा) उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या याचिकेवरील दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
अमोल कीर्तीकर यांनी याचिकेत उपस्थित केलेला मुख्य मुद्दा टेंडर मतांशी संबंधित आहे. अमोल कीर्तीकर यांच्या म्हणण्यानुसार एकूण ३३३ टेंडर मते आहेत असा युक्तीवाद केल्याने न्या. संदीप मारणे यांच्या एकलपीठाने निकाल राखून ठेवताना नमूद केले. मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान १२० टेंडर मतं गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ टेंडर मत होती त्यापैकी १२० टेंडर मतं मोजली गेली नाहीत. टेंडर मतांची फेरमोजणीची विनंती केली होती, पण ती नाकारण्यात आल्याचा दावा, कीर्तीकर यांचे वकील प्रदिप पाटील आणि अमित कारंडे यांनी केला. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल फोनचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही कीर्तीकरांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे टेंडर मतं ही या संपूर्ण प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचेही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दुसरीकडे, याचिका ऐकण्यायोग्य नसल्याचा दावा रविंद्र वायकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी केला. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच टेंडर मतं ही विजयी उमेदवारांना कशी मिळाली हे दाखविण्यास याचिकाकर्ते अपयशी ठरल आहेत. त्यामुळे न्यायालयाने याचिका फेटाळून लावावी, अशी मागणीही साखरे यांनी केली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.
काय आहे प्रकरण
उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून रविंद्र वायकरांची निवड रद्दबातल करण्यात यावी, तसेच आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणीही अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून केली. अमोल कीर्तीकर यांचा रविंद्र वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. रविंद्र वायकर यांना ४,५२,६४४ तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केल्याचा दावा अमोल कीर्तीकर यांनी याचिकेतून केला.
काय आहे टेंडर वोटिंग
नावातील साधर्म्यामुळे अनेकदा चुकीने एखाद्याचे मतदान आधीच कुणी दुसरा येऊन करतो. त्यानंतर त्या नावाची व्यक्ती आल्यानंतर तिची ओळख पटवून त्याला मॅन्युअल वोटिंग म्हणजेच टेंडर वोटिंगची संधी दिली जाते. या मतदानाची वेगळ्या पाकिटात नोंद ठेवली जाते.
१२० मते गहाळ झाल्याचा दावा अमोल कीर्तीकर यांनी केल्यामुळे रविंद्र वायकर यांच्या खासदारकीबाबत उच्च न्यायालय काय निर्णय देणार याविषयी विविध तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
Marathi e-Batmya