ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली
जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’
आशा भोसले सिद्धहस्त व प्रतिभासंपन्न गायिका: राज्यपाल जिष्णु देव वर्मा
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
आशा भोसले या देशातीलच नाही तर संगीत विश्वातील सिद्धहस्त आणि प्रतिभासंपन्न पार्श्वगायिकहोत्या.आपल्या अवीट स्वरांनी, विविध संगीत प्रकार लीलया गाण्याच्या क्षमतेने आणि संगीतातील व्यापक योगदानामुळे त्यांनी संगीत रसिकांच्या अनेक पिढ्यांवर राज्यकेले.
आपल्या जवळपास आठ दशकांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी विविध भाषा व संगीत प्रकारांमध्ये असंख्य अजरामर गीते सादर करून भारताच्या सांस्कृतिक परंपरेला समृद्ध केले.आशाजींची भावोत्कटता व कलेप्रती बांधिलकी भावी पिढ्यांमधील कलाकार आणि रसिकांना प्रेरणादेतराहील.‘जो भी है बस यही एक पल है’ हे त्यांचे गाजलेले गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान झाले होते.आशाजींच्या निधनामुळे संगीत विश्वाचे, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे, कधीही भरून न येणारे नुकसानझालेआहे.आशाजींचा विवाह आर. डी. बर्मन यांच्याशी झाल्यामुळे त्यांचा आमच्या घराण्याशी देखील निकटचा संबंध होता.
या दुःखद प्रसंगी मी महाराष्ट्रातील जनतेच्या तसेच आपल्या स्वतःच्या वतीने दिवंगत आशाजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना तसेच संपूर्ण संगीत क्षेत्राला आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
*****
बारमाही ऋतू हिरवा; भावभावनांचा सुरेल महासागर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह २० भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली.
‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर…’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
0000
स्वरांचा ‘सप्तक’ पोरका; अभी ना जाओ छोड कर…..
आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतीय संगीत सृष्टीतील अढळ ध्रुवतारा आणि आपल्या सुरावलींनी अवघ्या जगाला मोहिनी घालणाऱ्या ‘पद्मविभूषण’, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनामुळे देशाने एक महान स्वरसम्राज्ञी गमावली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता आशाताईंच्या जाण्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे असेही उपमुख्यमंत्री म्हणतात.
आशाताईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, आज प्रत्येक रसिकाच्या मनात एकच आर्त साद उमटत आहे “अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नहीं”. आशाताईंनी त्यांच्या गाण्यांनी आपल्याला इतकं समृद्ध केलं की, त्या कधीतरी आपल्याला सोडून जातील ही कल्पनाच सहन होत नाही. त्यांच्या आवाजातील तोच उत्साह आणि तीच तरलता आता पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेत पुढे म्हणतात, आशाताई गेल्यामुळे महाराष्ट्रातल्या घराघरातल्या प्रत्येकाला कोणीतरी आपल्या परिवाराचा सदस्य गमावल्याचे दुःख आज होत आहे.
आशाताई म्हणजे केवळ एक गायिका नव्हत्या, तर त्या संगीतातील चैतन्याचा झरा होत्या. भक्तीगीत असो, लावणी असो किंवा पाश्चात्य ढंगाची गाणी, प्रत्येक सुरात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. सर्वाधिक गायनाचा विक्रम करून त्यांनी गिनीज बुक मध्ये आपलं नाव नोंदवलं.
प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले ही जिद्द आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र आणि मराठी मातीवर त्यांचे अतोनात प्रेम होते. मराठी भावगीतांना त्यांनी जे वैभव मिळवून दिले, त्यासाठी महाराष्ट्र सदैव त्यांचा ऋणी राहील.
त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने संपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
………………………………………….
संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती.
आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Marathi e-Batmya