‘बारायण’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : प्रतिनिधी

निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेश देणारा ‘बारायण’ हा मराठी चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे. दिग्दर्शक दिपक पाटील आणि निर्मात्या दैवता पाटील यांच्या ‘ओंजळ आर्टस् प्रॉडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या ‘बारायण’ची प्रस्तुती भारतीय जनता पार्टीच्या नेत्या शायना एन.सी. यांनी केली आहे. दिग्दर्शक दिपक पाटील यांचा हा पहिला मराठी चित्रपट असून त्यांनी यापूर्वी विविध हिंदी, मराठी दूरचित्रवाहिन्यासाठी प्रोमो डिरेक्टर म्हणून काम केलेले आहे. ‘बारायण’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात, नेहरु सेंटर, मुंबई येथे करण्यात आला.  शिक्षणाचे बाजारीकरण, मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांची अति काळजी, भोंदुगिरी, अश्या विविध मुद्द्यांवर अतिशय रंजक आणि खोचक पद्धतीने दिग्दर्शकाने प्रकाश टाकला आहे. बारावीची टक्केवारी खरंच आयुष्य बदलवणारे वळण आहे का? पालक इयत्ता आठवी पासूनच बारावीच्या परीक्षेची युद्धपातळीवर तयारी करून घेतात आणि मग घराघरात ‘बारायण’ सुरु होते. यावर अतिशय खुमासदार शैलीत दिग्दर्शक दिपक पाटील यांनी भाष्य केले आहे.

‘बारायण’मध्ये अभिनेता अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे आणि त्यासोबत अभिनेते नंदू माधव बाबांच्या भूमिकेत, आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर, आत्याच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते दिसणार आहेत. याशिवाय अभिनेते संजय मोने, ओम भूतकर, रोहन गुजर, उदय सबनीस, प्रसाद पंडित, समीर चौगुले, श्रीकांत यादव, कुशल बद्रिके, प्रभाकर मोरे तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निपुण धर्माधिकारी या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अतिशय हटके पध्दतीने मनोरंजन करणाऱ्या ‘बारायण’ ची कथा, दिग्दर्शक दिपक पाटील यांची असून पटकथा–संवाद निलेश उपाध्ये यांचे आहेत. सिनेमाचे छायाचित्रण मर्ज़ी पगडीवाला यांनी केले आहे. गीतकार वलय, गुरु ठाकूर, क्षितिज पटवर्धन यांच्या गीतांना; संगीतकार पंकज पडघन यांचे मधुर संगीत लाभले आहे. तर आशिष झा यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिले आहे. बऱ्याच वर्षानंतर अलका याग्निक यांचा आवाज मराठी गाण्याला लाभला आहे. फक्त विद्यार्थ्यांनी नव्हे तर पालकांनी देखील आवर्जून बघायला हवा असा ‘बारायण’ हा चित्रपट थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात देखील दाखविला जाणार आहे.

 

 

 

About Editor

Check Also

अभिनेता धर्मेंद्र मुंबईतील ब्रीच कँडीत दाखलः वैद्यकीय पथकाच्या निरिक्षणाखाली अभिनेत्री हेमा मालिनी यांची सोशल मिडीयातून माहिती

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पत्नी, अभिनेते-राजकारणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *