Breaking News

वर्षभरानंतर सापडला राजेश खन्नाच्या नायिकेचा सांगाडा कुटुंबासह झाली होती बेपत्ता

निर्मात्यांनी तिला मोठी रक्कम देऊन चित्रपटासाठी साईन केले होते. पण, ती अचानक गायब झाली. निर्माते चिंताग्रस्त झाले. निर्मात्यांचे पैसे घेऊन फरार झाल्याचा आरोप तिच्यावर होऊ लागले. मात्र, तपास सुरू झाला तेव्हा धक्कादायक बाबी पुढे आल्या. केवळ तीच नाही तर सुट्टीवर गेलेले तिचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता होते. त्या अभिनेत्रीचा जन्म मुंबईत १९७८ मध्ये झाला. तिच्या आईचे नाव अथिया पटेल. तिला सर्वजण सेलिना म्हणत. तिचे पहिले लग्न नादिर पटेल यांच्याशी झाले. ज्यापासून तिला ४ मुले झाली. ती, तिची मोठी बहीण आणि दोन जुळे भाऊ हे तिचे कुटुंब… पण, त्या अभिनेत्रीच्या खून आणि कटाची ही कहाणी थंडावणारी आहे. ती अभिनेत्री होती लैला खान…

लैला खान हिचा लहानपणापासून ग्लॅमर जगताकडे कल होता. त्यामुळे तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. कन्नड चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पण, तिचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला. पहिला चित्रपट फ्लॉप ठरला त्यामुळे लैला खानला अनेक वर्षे काम मिळाले नाही. दीर्घ संघर्षानंतर लैला खानला पुन्हा २००२ मध्ये बिग बजेट कन्नड चित्रपट ’मेकअप’मध्ये काम मिळाले. ३० नोव्हेंबर २००२ रोजी ’मेकअप’ प्रदर्शित झाला. त्याचे समीक्षकांनी कौतुक केले. परंतु, बॉक्स ऑफिसवर तो फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्यांना ७५ लाखांचे नुकसान झाले. पण, संयमाचे फळ गोड असते असे म्हणतात. राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याने ‘वफा: अ डेडली लव्ह स्टोरी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात लैला खान हिला अविश्वासू पत्नी म्हणून दाखवण्यात आले होते. सुपरस्टार राजेश खन्ना यांनी या चित्रपटामधून कमबॅक केले होते.

१९ डिसेंबर २००८ रोजी प्रदर्शित झालेला ‘वफा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. पण, सी-ग्रेड चित्रपट केल्याबद्दल राजेश खन्ना यांच्यावर जोरदार टीका झाली होती. हा चित्रपटही लैलाला नाव आणि प्रसिद्धी मिळवून देऊ शकला नाही. काही काळ गेला. वफाचे दिग्दर्शक राकेश सावंत यांनी लैला खान हिला ‘जिन्नत’ या दुसर्‍या चित्रपटात साईन केले होते. राकेशने लैला हिला साइनिंग अमाउंट म्हणून मोठी रक्कम दिली होती. या चित्रपटात राखी सावंतही महत्त्वाच्या भूमिकेत होती. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. वेळापत्रक पूर्ण झाले. पुढील शूटिंग शेड्यूल सुरू व्हायला थोडा वेळ होता. त्यामुळे लैला खान हिने तिच्या कुटुंबासह इगतपुरीत सुट्टी घालवण्याचा बेत आखला.

३० जानेवारी २०११ रोजी लैला खान तिची आई सेलिना, मोठी बहीण हाशिमा, जुळी भावंडे इम्रान-झारा आणि चुलत बहीण रेश्मा यांच्यासह इगतपुरी येथील फार्महाऊसला निघाली. रेश्मा लैलाच्या कुटुंबासोबत राहत होती. संपूर्ण कुटुंबाने मुंबईपासून १२६ किलोमीटरचा प्रवास कारमध्ये केला. जेमतेम ९ दिवस झाले होते. ९ फेब्रुवारी २०११ रोजी सेलिनाला तिची बहीण अल्बाना पटेल हिचा फोन आला. जेव्हा अल्बानाने लीलाची चौकशी केली. त्यावेळी सेलिनाने ‘परवेझ टाकसोबत चंदीगडमध्ये आहे.’ असे सांगितले. पण, त्यावेळी सेलिना हि इगतपुरीमध्येच होती. सुट्टीवर गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा हा शेवटचा दिवस होता.

जिन्नत चित्रपटाच्या दुसर्‍या शेड्यूलच्या तारखा जवळ येऊ लागल्या. चित्रपट निर्मात्यांनी लैलासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तिचा नंबर बंद होता. लैलाची बातमी न मिळाल्याने निर्मात्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिला पैसे दिले होते. दिवस आणि नंतर काही महिने उलटले. लैला आणि तिच्या कुटुंबाची काहीच खबर नव्हती. दिग्दर्शक राकेश सावंत यांना पैसे घेऊन ती पळून गेल्याची बातमी एका पत्रकाराला सांगितली. त्याने या कथेवर काम करायला सुरुवात केली. पण, तपासादरम्यान लैला खान अनेक महिन्यांपासून बेपत्ता होती. तिची कार अनेक महिन्यांपासून दिसत नव्हती. केवळ अभिनेत्रीच नाही तर तिचे संपूर्ण कुटुंब बेपत्ता असल्याची माहिती त्याला मिळाली.

तो पत्रकार तक्रार देण्यासाठी गेला असता पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. जोपर्यंत तिचे खरे नातेवाईक येऊन अहवाल देत नाहीत तोपर्यंत आपण तपास करणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्या पत्रकाराने लैलाच्या कुटुंबाची शोध मोहीम हाती घेतली. त्यातून त्याला कळले कि, लैला हिची आई सेलिना हिने वडील नादिर यांना घटस्फोट दिला. नादिर एक साधा माणूस होता. सेलिनापासून वेगळे झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले आणि तो इथिओपिया, आफ्रिकेत गेला. सेलिना हिने चारही मुलांना स्वतःकडे ठेवले. मीरा रोड येथे राहणार्‍या आसिफसोबत तिने दुसरे लग्न केले. मात्र, हे लग्नही फार काळ टिकले नाही. त्यामुळे सेलिनाने परवेझ नावाच्या व्यक्तीशी तिसरे लग्न केले.
खूप मेहनत करून त्या पत्रकाराने आसिफ शेखचा शोध घेतला. आसिफ यांनी त्याला लैलाचे वडील नादिर यांचा नंबर दिला. नादीर त्यावेळी आफ्रिकेतच होते. त्या पत्रकाराने त्यांना भारतात येण्याची विनंती केली. परंतु, आर्थिक अडचणींमुळे नादिरने भारतात येण्यास नकार दिला. त्यामुळे त्या पत्रकारानेच त्याला पैसे देऊन भारतात येण्याची व्यवस्था केली. हे सर्व करण्यात चार महिन्यांचा कालावधी गेला. नादिर यांनी भारतात आल्यानंतर मुंबई गाठली आणि पोलिसात तक्रार दिली.

मात्र, तक्रार दाखल करूनही मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला नाही. अभिनेत्री लैला खान पाकिस्तानी असल्याचे सांगत हे प्रकरण त्यांनी पुढे ढकलले. वडील नादिर यांनी या प्रकरणावरून चांगलाच गदारोळ केला. ते म्हणाले, पोलीस तिला पाकिस्तानी कसे म्हणू शकतात. नादिर हे भरूचचे तर आई सेलिना हि लखनौची होती. त्यामुळे त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. पण, पोलीस मात्र या प्रकरणात अत्यंत बेफिकीर होते. आधी तक्रार नोंदवायला वेळ लागला आणि नंतर तपास केला नाही. त्यामुळे वडील नादीर यांनी १७ जुलै २०१२ रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे प्रकरण एनआयएकडे (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) सोपवण्याची विनंती केली.

दहशतवादी हल्ल्यामुळे सत्य समोर आले

लैला खान बेपत्ता झाल्याच्या एका वर्षानंतर जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला झाला. तपासादरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाजवळ लैला खान यांची कार सापडली. त्या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाने घेतली. लैला खान आणि तिची आई सेलिना यांनी लष्कर-ए-तैयबासोबत काम केल्याची बातमी मीडियामध्ये पसरली. तर, पोलिसांनी परवेझ इक्बाल टाक याला २१ जून २०१२ रोजी दहशतवादी हल्ल्याप्रकरणी अटक केली होती.

लैला खान बेपत्ता होण्याच्या प्रकरणात परवेझची अटक हा महत्त्वाचा दुवा ठरला. परवेझ टाक हा एकमेव व्यक्ती होता जो इगतपुरीत लैलाच्या कुटुंबासोबत शेवटचा दिसला होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. परवेझ टाक यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत धक्कादायक खुलासा केला. त्याने लैला आणि तिच्या कुटुंबाची फेब्रुवारी २०११ मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची कबुली दिली. बेपत्ता प्रकरणाचे रूपांतर आता खुनाच्या प्रकरणात झाले होते.

लैला खान हिचे सावत्र वडील परवेझ टाक याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला सेलिना हिला मारायचे होते. सेलिनाने त्याला नोकरांसारखे वागवले. इतर पुरुषांशी संबंध ठेवले. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी परवेझने मित्र साजिदसोबत तिच्या हत्येचा कट रचला. तो दुबईला जाणार होता. पण, संधी पाहून त्याने लैलाच्या आईला दुबईला जाण्यापूर्वी सुट्टीत कुटुंबासह इगतपुरीला जायचे असल्याचे सांगितले. लैला आणि तिचे कुटुंबीय इगतपुरीला पोहोचण्यापूर्वीच परवेझ टाकने मित्र साजिद यालाही फार्महाऊसवर बोलावले.

एके दिवशी संधी मिळताच परवेझ याने मित्र साजिदच्या मदतीने सेलिनाची रॉडने हत्या केली. याचवेळी लैला खान तिथे पोहोचली. त्यामुळे त्यांनी लैलाचीही हत्या केली. पण, या हत्येमध्ये आपण अडकू या भीतीने परवेझ आणि साजिद यांनी फार्महाऊसवर असलेल्या सर्वांचीच हत्या केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इगतपुरी येथील फार्महाऊसवर गाठले. परवेझच्या सूचनेवरून पोलिसांनी फार्महाऊसच्या मागील भागात खोदकाम सुरू केले.. उत्खननादरम्यान पोलिसांना लैला खानसह कुटुंबातील ६ सदस्यांचे सांगाडे सापडले. पोलिसांना चकमा देण्यासाठी त्याने मित्र जॉली गिल्डर आणि मेहबूब यांची मदत घेऊन तिन्ही गाड्या फोडल्या. पहिली कार इंदूरला आणि दुसरी कार दिल्लीला पाठवण्यात आली. तिसरी गाडी किश्तवाडला नेण्यात आली. पण, किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिसरी गाडी सापडली आणि परवेझ जाळ्यात सापडला. लैला खान आणि कुटुंबाची हत्या केल्यानंतर परवेझ टाक लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या मदतीने नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याआधीच तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता.

  • महेश पवार

Check Also

अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न

मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *