मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात कमी उपस्थितीत कामकाज चालविण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य होणार नसल्याने नागरीकांनी गरज असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी वरील आवाहन केले.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर पोहोचली असून यात २६ पुरूष आणि १४ महिलांचा समावेश झाला आहे. यातील एखादं दुसरा रूग्ण गंभीर असून त्यातील अनेकांची तब्येत चांगली आहे. नागरीकांनी गर्दी कमी करण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. जर नागरीकांनी स्वतःहून गर्दी करणे बंद केले नाहीतर लोकल, सीटी बसेस ज्या आतापर्यंत बंद केलेल्या नाहीत त्या बंद कराव्या लागतील असा इशाराही त्यांनी राज्यातील नागरीकांना दिला.
प्रत्येक शहरातील, भागातील दुकानदारांनीही फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवून ज्या वस्तूंशी दैंनदिन जीवनाशी निगडीत नाहीत अशी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सरकारी कार्यालयातही कामाच्या निमित्ताने गर्दी होण्याचे प्रकार वाढत आहेत. ही वाढती गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने ५०-५० टक्के अधिकारी-कर्मचारी ठेवून कार्यालये सुरु ठेवण्याचा सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya