वरळीची जागा मनसे लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. तसेच वरळीत राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमही घेण्यात येत होते. त्यामुळे अमित ठाकरे हे वरळीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरणार नसल्याची चर्चाही राजकिय वर्तुळात सुरु झाली. मात्र काल रात्री उशीरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली यादी जाहिर करण्यात आली. या यादीत वरळीतून संदीप देशपांडे तर माहिम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे उभे राहणार असल्याचे जाहिर करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे आज जाहिर करण्यात आले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांचा मुळचा बालेकिल्ला हा माहिम विधानसभा मतदारसंघ आहे. येथील वार्डातूनच ते मुंबई महापालिकेवर निवडूण गेले होते. मात्र गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे संदीप देशपांडे यांना यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी वरळीतून उमेदवारी देण्यात आली. वास्तविक पाहता वरळीत संदीप देशपांडे यांची उमेदवारी आदित्य ठाकरे यांच्या तुलनेत कमजोर मानली जात आहे. तर दुसऱ्याबाजूला अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आल्याने शिवसेना उबाठाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.
मनसेच्या अमित ठाकरे यांचे या निवडणूकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात पदार्पण होत आहे. त्यातच ते राज ठाकरे यांचे सुपुत्र असल्याने अमित ठाकरे हे वजनदार नाव माहिम विधानसभा मतदारसंघात चर्चिले जात आहे. त्या तुलनेत शिवसेना उबाठाकडून जाहिर करण्यात आलेले उमेदवार महेश सावंत यांचे नाव अगदीच नाममात्र वाटत आहे. त्यामुळे माहिती विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे विधानसभेवर निवडूण जाणार तर वरळीतून आदित्य ठाकरे हे हॅटट्रिक साधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे मुंबई आणि राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी आपापल्या मुलांच्या राजकिय भवितव्याचा अनुषशंगाने सुरक्षित खेळी केल्याचे बोलले जात आहे. माहिम मधून अमित ठाकरे तर वरळीतून आदित्य ठाकरे हे विधानसभेवर निवडूण जाणार असल्याचे आतापासून गृहीत धरले आहे. वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आदित्य ठाकरे हे उद्या भरणार असल्याचे शिवसेना उबाठा गटाकडून जाहिर करण्यात आले.
Marathi e-Batmya