मुंबईकरांसाठी कोस्टल रोड टोलमुक्त रस्त्याच्या भूमिपूजनप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांनी शिवसेनेला भरभरून प्रेम दिले आहे. त्यामुळे निवडणूकीत जी आश्वासन देतो ती आम्ही पूर्ण करत असून स्वप्न वास्तवतेत उतरविण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येतात. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबईकरांच्या सेवेसाठी कोस्टल रोड उभारणीच्या कामास मुंबई महापालिकेकडून सुरुवात करण्यात येत असल्याचे जाहीर करत हा रोड टोल मुक्त राहणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी रविवारी केली.

१८ डिसेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण येथे मेट्रो कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अद्याप निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेच्यावतीने  घाईघाईत कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करत या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुद्दाम निमंत्रण दिले नाही.

मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शहर बनवायचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडची उभारणी करण्यात येत आहे. नरिमन पॉईंट ते वांद्रे पर्यंत हा रस्ता बांधण्याची परवानगी राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिली आहे. त्यापुढील रस्ता राज्य सरकार स्वत: बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवायचे असल्याने त्या दर्जाच्या सर्व गोष्टीं उभारण्यात येत आहेत. वरळी ते वांद्रे दरम्यान उभारण्यात आलेल्या सी-लिंक रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे. आता त्या पुढील जो सी-लिंक उभारला जाणार आहे. त्याचे भूमिपूजनही शिवसेनेच्या हस्ते होईल असे आश्वासक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

मुंबई महापालिकेच्या कारभारावर अनेकजण टीका करतात. परंतु पालिकेने केलेले काम परदेशात जाणाऱ्या काही जणांना नक्कीच दिसत असतील अशी उपरोधिक टीका भाजपच्या नेत्यांवर नाव न घेता करत महापालिकेने नेहमी आंतरराष्ट्रीय दर्जाचेच काम केल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *