मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्र स्थानांमध्ये विविध रंग संकेतन मतदान केंद्र मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक जिल्हा अधिकारी संजय यादव

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र स्थानांवरील (Polling Station Location) मतदान केंद्रांवर मतदार गेल्यानंतर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये, गर्दीचे नियंत्रण व्हावे यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध रंग संकेतन (Colour Coding) असलेले मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मतदार माहिती चिठ्ठयांसह (Voter Information Slip) रंग संकेतन मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक जिल्हा अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

संजय यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेली सुमारे ३१ मतदान केंद्र ठिकाणे असून या मतदान केंद्र स्थानांवर सुमारे ३६१ मतदान केंद्रे आहेत. यातील काही मतदान केंद्र स्थानांवर एकाच ठिकाणी १८ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर सुमारे १००० ते १४०० मतदार आहेत. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये, मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, गर्दी टाळावी यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांसाठी रंग संकेतन मतदान केंद्र तयार केली जात असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना संजय यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मंतदारसंघांमधील विविध मतदान केंद्रात दिव्यांग, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व मतदारांकरीता सहाय्यता कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. मतदारांचे मतदान असलेले मतदान केंद्र, गुगल मॅपनुसार मतदान केंद्राचा नकाशा, मतदान केंद्राचा रंग संकेतन, मतदान केंद्र असलेल्या विभागाचा रंग, याबाबतची माहिती मतदार माहिती चिठ्ठयांसह मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पोहोचविण्यात आली असल्याचे सांगितले.

संजय यादव म्हणाले की, मतदान केंद्रांवर मतदारांना रंग संकेतन व अनुक्रमांकाचे टोकनही दिले जाणार आहे. त्यानुसार सदर टोकन घेतल्यानंतर मतदारांना रांगेत प्रतीक्षा कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रांगेतील क्रमांकानुसार मतदारांना मतदानासाठी त्या त्या रंग संकेतन मतदान केंद्रात सोडले जाणार असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त निवडणूक जिल्हा अधिकारी सांगितले.

मतदान केंद्रांवर रांग व्यवस्थापन

मतदान केंद्रांवर रांगांचे व्यवस्थापन केले जाणार असून त्याकरिता स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी सुयोग्य दिशादर्शक फलक लावले जाणार आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रांगा असणार आहेत तर मतदानासाठी ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. मतदान संपण्याच्या वेळी रांगेत असलेल्या सर्व मतदारांना त्यांचे मत नोंदविण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *