Breaking News

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची स्पष्टोक्ती, पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव… स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती शक्य

पर्युषण हा केवळ जैन धर्माचा उत्सव नसून तो संपूर्ण मानवतेच्या आंतरिक शुद्धीचा उत्सव आहे. केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे. स्वतःसोबत निरपेक्ष सेवाभावाने इतरांसाठी जगल्यास प्रगत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित ‘पर्युषण महोत्सव २०२४’ शनिवारी संपन्न झाला, त्यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुढे बोलताना म्हणाले की, इतरांसाठी जगणे हा भारतीय तत्त्वज्ञानाने दिलेला शाश्वत विचार असून कोविड प्रतिबंधक लस निर्माण केल्यानंतर भारताने याच विचारामुळे लसीच्या माध्यमातून इतर देशांकडून नफा न कमावता अनेक राष्ट्रांना मोफत लस वितरित केली. अध्यात्म हा केवळ बोलण्याचा विषय नसून अध्यात्म म्हणजे ज्ञानाचे व्यावहारिक कृतीत रूपांतर करणे आहे असे सांगून मनुष्य मात्रांसह प्राणिमात्र व अजीव वस्तूंबाबत सहानुभूती बाळगणे म्हणजे अध्यात्म असल्याचे सांगितले.

या संदर्भात श्रीमद राजचंद्र मिशन ही संस्था धरमपूर गुजरात व मुंबईत अद्ययावत प्राणी सेवा रुग्णालय सुरु करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

पुढे बोलाना राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की, महात्मा गांधी यांच्या विचारांवर श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा मोठा पगडा होता असे सांगून, सत्य व अहिंसा यांची कास धरून गांधीजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. श्रीमद राजचंद्र यांच्या विचारांचा वारसा श्रीमद राजचंद्र मिशनच्या माध्यमातून पुढे नेत असल्याबद्दल राज्यपालांनी गुरुदेव राकेशजी यांचे अभिनंदन केले.

शाकाहारातून विचार परिवर्तन

शाकाहारी अन्न मनुष्यांसाठी उत्तम असून शाकाहारामुळे मनुष्याच्या विचारात मोठे परिवर्तन होते असा आपला वैयक्तिक अनुभव आहे असे राज्यपालांनी सांगितले. सन २००० पासून आपण संपूर्ण शाकाहारी झालो व त्यामुळे आपले विचार तसेच समाजाप्रती दृष्टिकोन यात अमूलाग्र बदल झाला, असे राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी विकासासाठी कार्य करणार

आदिवासी विकास कार्यावर विशेष लक्ष देण्यासाठी राजभवन येथील ‘आदिवासी कक्ष’ पुनरूज्जीवित करण्यात आला असून राज्यातील साडे नऊ टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आपण कार्य करणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. श्रीमद राजचंद्र मिशन देखील आदिवासी विकास क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांना देखील आदिवासी विकास कार्याशी जोडणार असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मिशनचे अध्यात्मिक प्रमुख पूज्य गुरुदेवश्री राकेशजी यांचेसह राज्यपालांच्या हस्ते यावेळी दान केलेल्या वस्तूंचा वितरण महोत्सव ‘द पॉवर ऑफ वन’ व ऑपेरा हाऊस येथील श्रीमद राजचंद्रजी मार्ग येथे आयोजित ‘जॉय ऍव्हेन्यू’ या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ उद्योजक मोतीलाल ओसवाल, सुभाष रुणवाल व श्रीमद राजचंद्र मिशनचे अध्यक्ष अभय जेसानी उपस्थित होते.

Check Also

मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *