मुंबईः प्रतिनिधी
मध्यरात्रीपासूनच मुंबईसह उपनगरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सकाळी १०.३० वाजल्यानंतर उघडीप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरातून कामावर तरी जावू देतो की नाही म्हणून विचार करणाऱ्या चाकरमान्यांना या उघडपीने चांगलाच दिलासा मिळाला.
मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबविली, दादर, सायन, कुर्ला, माटुंगा,विक्रोळी, अंधेरी, हिंदमाता आणि लालबागमध्ये मध्यरात्रीपासून संततधार सुरूच होती. त्यातच सायन-माटुंगा या रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे दादर ते कुर्ला दरम्यानची वाहतूक धीम्या गतीने सुरू राहिल्याने मध्य मार्गावरील रेल्वेसेवा १० ते १५ मिनिटे उशीराने सुरु होती. तसेच मुसळधार पावसामुळे दादरच्या हिंदमाता आणि सायन परिसरात पाणीच पाणी झाल्याने प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला होता.
मात्र सकाळी १०.३० नंतर मुसळधार पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केल्याने हळुहळू रेल्वे आणि बस, वाहनांची वाहतूक सुरुळीत होण्यास सुरुवात झाली. दक्षिण मध्य आणि मुंबई शहरात पाऊस पूर्णपणे थांबल्याने कार्यालय गाठण्यासाठी घाई करण्यासाठी घरातून बाहेर पडलेले चाकरमानी उशीरा का होईना आपल्या कार्यालयात पोहचले.
सांताक्रूझमध्ये ५८ मिमी, तर कुलाबामध्ये १७१ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती वेधशाळेने दिली.
Marathi e-Batmya