प्रताप सरनाईक यांची माहिती, दहिसर टोल नाका वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ स्थलांतरित करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो.  तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वर्सोवा पुलासमोरील नर्सरी जवळ दिवाळीपूर्वी स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. या बैठकीला दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई- विरार आयुक्तालयाचे  पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आयआरबी IRB चे ठेकेदार विरेंद्र म्हैसकर इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक टोल नाके रद्द केले. तसेच सर्व टोल नाक्यावरील लहान वाहनांना टोलमाफी केली. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. दहिसर टोल नाक्यामुळे  मिरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. यामुळे प्रवासाचा वेळ अर्धा ते एक तास वाढत असून इंधनाचा विनाकारण अपव्यय होत होता.

या कारणास्तव मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा टोल नाका शहराच्या आत असल्याने, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा टोल नाका २ किलोमीटर अंतावर  हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल अशी आग्रही मागणी प्रताप सरनाईक यांनी केली होती.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला  आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या बाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवेल, तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक  मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. *यासाठी एक ते दीड महिना वेळ लागेल, त्यामुळे या दिवाळीपूर्वी सदर टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील  स्थानिक नागरिकांना टोलमुक्त प्रवासाचा भेट शिवसेनेच्यावतीने मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

About Editor

Check Also

रामदास आठवले यांचे निर्देश, महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवा ६९ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त आयोजित बैठकीत दिले निर्देश

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *