Breaking News

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी भाजपा-शिंदे सरकारचे तुघलकी फर्मान कुर्ल्यातील शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारी नोटीस

राज्यातील भाजपा युती सरकारला जनाची नाही आणि मनाचीही नाही. दोन गुजराती मालकांच्या आदेशाने काम करणारे युती सरकार मुंबईकरांच्या जीवावर उठले आहे. मुंबई अदानीला विकूनच शिंदे-फडणवीसांचा आत्मा शांत होईल असे दिसत आहे. कुर्लाच्या मदर डेअरी कर्मचारी वसाहतीतील कुटुंबांना पर्यायी व्यवस्था न देताच १५ दिवसात घरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अदानीच्या स्वार्थासाठी शासकीय कर्मचा-यांना बेघर करणारे हे तुघलकी फर्मान असल्याचा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांचे परममित्र अदानीसाठी भाजपा युती सरकार कोणत्याही थराला जायला तयार आहे. ऐन गणपती उत्सवाच्या काळात कुर्ला येथील मदर डेअरीच्या कर्मचारी वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांना १५ दिवसांत घरे खाली करण्याचे फर्मान काढले आहे. ही कुटुंबे वर्षानुवर्षे या जागेत वास्तव्यास असून केवळ अदानीच्या स्वार्थासाठी या लोकांना विस्थापित केले जात आहे. अजूनतरी या कुटुंबांना कुठेही राहण्याची पर्यायी व्यवस्था दिलेली नाही असे असताना त्यांना घरे खाली करण्याचे आदेश देणे, हा सरकारचा किळसवाणा प्रकार आहे. हे सरकार आपल्या लाडक्या उद्योगपतीसाठी निर्लज्जपणे लोकांना बेघर करत असल्याचा आरोपही यावेळी केला.

वर्षा गायकवाड पुढे बोलताना म्हणाल्या की, मदर डेअरीच्या जागेवर केवळ सार्वजनिक उद्यान उभारले जावे, यासाठी कुर्ल्यातील नागरिकांनी मोठी जनचळवळ उभारलेली आहे. तरी देखील मित्रासाठी काहीही करण्यास तत्पर असलेले भाजपा सरकार लोकांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. जनतेचा आवाज दडपण्यासाठी दडपशाही मार्ग अवलंबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर हे मदर डेअरीच्या जमीन हस्तांतरणाच्या आदेशाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याचा खोटा दावा वारंवार करत आहेत. पण धारावी पुनर्वसनाच्या आडून संपूर्ण मुंबई अदानीला विकण्याचा मोदानी सरकारचा हेतू आहे हेच वास्तव आहे. मुंबईकर मात्र भाजपाच्या लुटारू सरकारचे मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *