वर्षा गायकवाड यांचा विश्वास, मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची विजयी पताका फडकवू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या प्रश्नावर लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणूकीची घोषणा झाली असून काँग्रेस पक्ष निवडणुकीसाठी तयार आहे. महानगरपालिकेत भाजपा महायुतीने प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या पैशांवर दरोडा टाकला आहे. लाडके कंत्राटदार व लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकली जात आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईकरांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष ताकदीने निवडणूक लढवून काँग्रेस विजयी पताका फडकवेल, असा निर्धार मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

यासंदर्भात बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेत प्रशासकाच्या काळात उद्योगपती, बिल्डर, लाडके कंत्राटदार गब्बर झाले पण मुंबईकरांचे मात्र हाल झाले. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून मुंबईकरांना चांगले रस्ते, पाणी, शुद्ध हवा, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. भाजपा आज दुसऱ्यांकडे बोट करत आहे पण तेच २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेत होते आणि गेल्या ३ वर्षांपासून भाजपा महायुतीचे सरकार प्रशासकामार्फत महानगरपालिकेचा कारभार पहात आहे. या काळात मुंबई आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात एक नंबरवर घेऊन जाण्याचा विक्रम केला आहे. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी आणि बँकेतील ठेवी लुटल्या आहेत. भाजपा या निडणुकीतही धर्माच्या नावावर सामाजिक सलोखा बिघडवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मुंबईची निवडणूक ही मुंबईच्या समस्या आणि प्रश्नावरच झाली पाहिजे.

भाजपाचा खोटा अजेंडा पुन्हा उघड..

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने दाखल केलेल्या खोट्या नॅशनल हेराल्ड प्रकरणाची दखल घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने भाजपा पुन्हा तोंडावर आपटली आहे. भाजपाने काँग्रेस पक्ष, सोनियाजी व राहुल गांधी यांना बदनाम करण्याचा खोटा अजेंडा राबवला पण न्यायालयाने त्यांचे मनसुबे उधळून लावले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोणताही गुन्हा होत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ईडी, सीबीआय, आयकर या संस्थांचा गैरवापर करुन भाजपा सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत असते. न्यायालयाच्या निकालाने भाजपाचा खोटारडेपणा उघड झाला आहे. ‘सत्य परेशान हो सकता है, पर पराजित नहीं’, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

About Editor

Check Also

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत इच्छुक प्रशिक्षकांनी ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रांसाठी प्रशिक्षकांना केले आवाहन

मिशन लक्ष्यवेध या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *