मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या जिद्दीने व दबावाला बळी न पडता लढा दिला आहे. मुंबईकरांनी काँग्रेसचे २४ नगरसेवक महानगरपालिकेत पाठवले आहेत, हे २४ जण जनतेच्या प्रश्नावर काम करतील पण जे पराभूत झाले त्यांनी खचून जाऊ नये, आपल्या वार्डातील जनतेचे प्रश्न, समस्या यावर आवाज उठवा, काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असल्याची ग्वाही मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई काँग्रेसचे कार्यालय राजीव गांधी भवन येथे पार पाडली. या बैठकीत आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर, सुभाष भालेराव, जावेद जुनेजा यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानगरपालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात व कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीनुसार मुंबईत काँग्रेस पक्षाने वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवली. एकीकडे पैशाचा प्रचंड वापर, पोलीस, प्रशासन, निवडणूक आयोग यांची मदत तर दुसरीकडे काँग्रेसचा विचार, संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी लढणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. या निवडणुकीत सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीनेसुद्धा दडपशाही केली. पण कोणत्याही दडपशाहीला, दबावाला काँग्रेसचा कार्यकर्ता घाबरला नाही. काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही पण मुंबईकरांच्या आरोग्य, पिण्याचे पाणी, प्रदुषण, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे यासह मुलभूत प्रश्नावर आवाज उठवू, असे आवाहनही यावेळी केले.
शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाले की, महानगरपालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद राहिली आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त केले नाहीत तसेच मतदार याद्या वेळेवर उपलब्ध करुन देण्यात आल्या नाहीत. निवडणुकीच्या अवघे आठ दिवस आधी मतदार याद्या प्रकाशित केल्याने यावर काम करण्यास वेळ मिळाला नाही, असे अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya