महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ११,२५५ कोटी रुपये कर हस्तांतरण आज जारी करण्यात आले. या निधीच्या रक्कमेत आगामी सणासुदीच्या काळात भांडवल खर्च भागविण्यासाठी एका अग्रिम हप्त्याच्या रक्कमेचाही समावेश आहे. उर्वरित निधी रक्कम ही राज्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्यासाठी आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांना १,७८,१७३ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ऑक्टोबर, २०२४ मध्ये देय असलेल्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त ८९,०८६.५० कोटी रुपयांच्या एका अग्रीम हप्त्याचा समावेश आहे.या हस्तांतरणाचा उद्देश आगामी सणासुदीच्या काळात राज्यांना भांडवली खर्चात मदत करणे आणि त्यांच्या विकास तसेच कल्याणकारी उपक्रमांना गती देण्याचा आहे.
महाराष्ट्राला या हस्तांतरणातून ११,२५५ कोटी रुपये मिळाले आहेत. हा निधी राज्याच्या महत्त्वाच्या योजना आणि उपक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत ठरणार आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांनाही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे, ज्यामध्ये उत्तर प्रदेशाला सर्वाधिक ३१,९६२ कोटी रुपये, बिहारला १७,९२१ कोटी रुपये आणि पश्चिम बंगाल राज्याला १३,४०४ कोटी रुपये मिळाले आहेत.
हे आर्थिक हस्तांतरण राज्यांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, ज्यामुळे भांडवल खर्च आणि लोककल्याणाच्या दृष्टीने राज्यांच्या विकासाला गती मिळेल.
केंद्र सरकारच्या वित्तीय विभागाने दिलेल्या या करातील हिश्शामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत ११ हजार २५५ कोटी रूपयांचा निधी जमा झाला आहे. त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिलांना माझी बहिण लाडकी योजनेतील १५०० रूपयांचा लाभ देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. कदाचित हा निधी मिळणार असल्यानेच सप्टेंबर अखेरपर्यंत माझी लाडकी बहिण योजनेतंर्गत अर्ज भरलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी केली होती. आता केंद्र सरकारनेच राज्याचा करातील हिस्सा ऐन निवडणूकीच्या तोंडावर राज्य सरकारला दिल्याने सरकारच्या अंगावर मुठभर मांस चढले आहे.
Marathi e-Batmya