नार-पार-गिरणा योजनेच्या सर्व मान्यता दोन महिन्यात देण्याची कार्यवाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

“नार-पार-गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती कडे पाठविण्यात आला असून येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळवून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता देण्यात येईल”, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभा सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नार-पार – औरंगा व अंबिका या चार पश्चिम वाहिनी नद्या महाराष्ट्रात उगम पावून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करुन पूर्वेकडील अति तूटीच्या गिरणा उपखो-यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार, पार, औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नदीखो-यातील ३०४.६ दलघमी पाणी नार-पार गिरणा नदी जोड योजनेसाठी वळविण्याचे नमूद आहे.

या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातून २६०.३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा करुन चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ कि.मी. लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, भडगाव तालुक्यांतील एकूण ५८ हजार ७६१ हेक्टर क्षेत्राला मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

About Editor

Check Also

अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा- विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *