संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणासाठी २००० कोटींचा सौदा जे लोक न्याय विकत घेतात त्यांच्याबद्दल काय बोलणार

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि दुसऱ्याबाजूला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याप्रश्नी बंडखोर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुनावणी सुरु होती. मात्र शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. यावरून राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेत संभ्रम निर्माण झालेला असतानाच आणि ठाकरे गटाक़डून या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलेला असतानाच खासदार संजय राऊत यांनी पक्ष नाव आणि चिन्ह मिळविण्यासाठी २००० कोटी रूपांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप केला. तसेच ही माहिती १०० टक्के खरी असल्याचे सांगत आणखी अनेक गोष्टी बाहेर येतील असे सूचक इशारा दिला.

यावेळी संजय राऊत यांनी आज सकाळी ट्विट करत शिंदे गटावर आरोप केला. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या काव्यपक्तीं असलेल्या ओळी पोस्ट करत न्याय व्यवस्था आणि राजकिय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

यावेळी बोलतना संजय राऊत म्हणाले, माझी खात्रीची माहिती आहे, चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे आणि १०० टक्के सत्य आहे.. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील..देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही ट्विटद्वारे सांगितले.

तसेच संजय राऊत म्हणाले, जे लोक न्याय आणि निर्णय विकत घेतात त्यांच्याबाबत काय बोलणार? मात्र माझ्या पर्यंत मिळालेली खात्रीलायक माहिती अशी आहे की २ हजार कोटींचं डील आत्तापर्यंत झालं आहे. पुरावे लवकरच देऊ, महाराष्ट्राला ते लवकरच समजेल. जो पक्ष आणि नेता नगरसेवकांना विकत घेण्यासाठी ५० लाख आणि १ कोटी रूपये देतो, जो नेता आमदारांना विकत घेण्यासाठी ५० कोटी देतो आणि खासदारांना विकत घेण्यासाठी १०० कोटी देतो त्याने निर्णय विकत घेणं सोपं आहेच. त्या नेत्याने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचं डील केलं आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.

किती मोठं डील झालं आहे हे समजून घ्यायचं असेल तर १०० ऑडिटर्स लावावे लागतील. जो निर्णय आला आहे तो न्याय नाही तो फक्त एक सौदा आहे असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

भारतीय जनता पक्षाला वाटलं तर उद्या ते मुंबई आणि महाराष्ट्रही विकत घेतील. आत्तापर्यंत चिन्ह आणि नाव २ हजार कोटी उडवण्यात आले आहेत. यापुढे अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी प्रयत्न होतील. २ हजार कोटी ही रक्कम लहान नाही. चार अक्षरांचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळण्यासाठी हे डील झालं आहे. मी ट्विट करून देशाला ही माहिती दिली आहे. आमच्याकडून आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्यात आलं आहे त्यासाठी हे एवढं मोठं डील झालं आहे. काही बिल्डरांनी मला ही माहिती दिली आहे त्याचे पुरावे आम्ही लवकरच देऊ असा इशाराही संजय राऊत यांना दिला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *