Breaking News

एकनाथ शिंदे यांच्या बंडावर शरद पवार यांची शांत प्रतिक्रिया, मार्ग निघेल मला विश्वास शिवसेनेकडून अद्याप कोणताही निरोप नाही

शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी २२ आमदारांना घेवून गुजरातमधील सूरतच्या आश्रयाला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना एक प्रस्ताव पाठवित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरील सरकार संपुष्टात आणून पुन्हा एकदा भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली. तसेच जर भाजपासोबत सरकार स्थापन केल्यास शिवसेनेतच राहु अन्यथा वेगळे राहु असा इशारा दिल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नवी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत अत्यंत शांत प्रतिक्रिया व्यक्त करत यातून काही तरी मार्ग निघेल असे आश्वासक उद्गार काढत शिवसेनेने काही निरोप दिल्यानंतर याबाबत काही बोलता येईल असे स्पष्ट केले.

सध्या निर्माण झालेली परिस्थिती पाहाता यातून काही ना काही मार्ग निघेल, असा मला विश्वास आहे. आत्तापर्यंत शिंदेंनी आम्हाला किंवा इतर कुणाला त्यांचा प्रस्ताव सांगितला नाही. पण तिन्ही पक्षांमधल्या चर्चेनुसार मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आणि उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. त्यात बदल करणं हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. त्यासंदर्भात शिवसेनेचं नेतृत्व जे काही निर्णय घेईल, त्यात आम्ही असू. पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात बदल करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आतापर्यत तीन वेळा प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळे हा प्रकारही त्यातीलच आहे. यापूर्वी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होण्यापूर्वी आमच्या पक्षाच्या काही आमदारांना नेवून असाच प्रयत्न केला गेला. मात्र तो प्रयत्न हाणून पाडण्यात आला. त्यानंतरही असे प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते यशस्वी होवू दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेकडून आपणाला काही सांगण्यात आले का? किंवा सरकार अस्थिर बनले आहे त्याबाबत काही सांगाल का? असा प्रश्न त्यांना काही प्रसारमाध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की, जो काही प्रकार झाला आहे. त्याबाबत शिवसेनेने काहीही अद्याप सांगितले नाही. ते प्रकरण शिवसेनेच्या अंतर्गत पक्षातील गोष्ट आहे. त्यामुळे त्यावर आधी निर्णय घेवू द्या, त्यानंतर आम्ही सर्व घटक पक्ष एकत्रित बसून निर्णय घेवू असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईला परत कधी जाणार असे विचारताच म्हणाले की, राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निवडीची बैठक आहे. ती बैठक झाल्यानंतर रात्री ८ वाजता मुंबईला जाणार असल्याचे सांगत मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.

यानंतर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने महाराष्ट्रातील सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत जाणार का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले की, काही तरी सेन्सिबल प्रश्न विचारा काहीही प्रश्न विचारणार का? असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला विचारत राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबतच का जाईल? विरोधात देखील बसू शकते असं उत्तर दिले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्लॅन बी तयार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र काहीही करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पडू द्यायचे नाही असा निश्चय राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत