अजित “दादा” पवार … नावातच दरारा आणि आधार ! एक प्रतिमा अशीही शिकाऊ पत्रकाराच्या नजरेतील

२८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्राला इतकी हादरवून सोडणारी असेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. जे अजित दादा काही क्षणांसाठी दिसले नाही तर त्यांच्या नॉट रिचेबलच्या बातम्या लागायच्या, त्यावर तासंतास चर्चा घडायच्या, सूर्य उगवण्याच्या आधी जे कामाला लागायचे ते अजित दादा पवार यांची प्राणज्योत उगवत्या सूर्याच्या साक्षीने मावळेल असा कोणी कधी विचारही केला नसेल पण नियतीच्या समोर कुणाचे काय चालते ? अजित दादा पवार यांच्या निधनाने फक्त एका नेत्याचा अंत झाला नाही तर राज्याने एक कुशल प्रशासक, प्रामाणिक राज्यकर्ता, ‘कामाचा माणूस’ गमावला आहे. आज राज्याचे वातावरण प्रचंड गढूळ झाले आहे. त्या वातावरणात अजित दादा पवार हे आशेचा किरण म्हणून दिसत होते पण अजित दादांच्या जाण्याने सारंच अंधःकारमय झालेलं दिसत आहे.

अजित दादा पवार यांच्या सोबत जवळून काम करण्याचा योग आला तो २०१४ ते २०१९च्या दरम्यान‌. या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी १५ वर्षांच्या काळानंतर पहिल्यांदाच विरोधात बसली होती. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश पाहून सर्व राजकीय पक्ष सोशल मीडियाचा वापर करू लागले. त्यामुळे पुढील काळात सर्व राजकीय पक्ष सोशल मीडिया टीम तयार करू लागले. मी आधी एका लोकल चॅनलमध्ये काम करायचो, त्यानंतर टिव्ही ९ मध्ये रुजू झालो पण काम जमत नव्हतं म्हणून भ्रमनिरास झाला. त्यावेळी किशोर गायकवाड (सध्या लोकसत्ता मध्ये कार्यरत आहेत) यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थिती सांगितली. किशोर सर ज्या संस्थेत कामाला होते ती संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सोशल मीडिया हँडल करायची. किशोर सरांनी टिव्ही ९ मधून उचललं आणि पराग पाटील सरांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये घेतलं. आपल्या दैनंदिन जीवनात सोशल मीडिया वापरत असल्याने सोशल मीडिया हाताळण्याचे काम जमले आणि अजित दादांच्या शब्दात सांगायचे तर मग काय गाडी सुसाट वेगाने सुटली…

साल होतं २०१७ चं, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि अर्थसंकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काहीच नाही अशी टीका करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी सभागृहात प्रचंड गदारोळ घातला होता. मला चांगलं आठवतंय जयंतराव पाटील, दिलीपराव वळसे पाटील, अजित दादा पवार अशी सिनियर मंडळी ही वेलमध्ये बसून आंदोलन करत होती तर तरुण आमदार अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले होते, अर्थसंकल्प फाडला गेला. गदारोळात विरोधी पक्षांचे तब्बल १९ आमदार निलंबित केले गेले होते. भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, मधुसूदन केंद्रे, संग्राम जगतप, अमर काळे, विजय वडेट्टीवार, अब्दुल सत्तार निलंबित आमदारांची अशी मोठी यादी होती. सरकारच्या या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध म्हणून विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली. संघर्ष यात्रा हीच ती पहिली असाईंमेंट ज्यावेळी दादा जवळून अनुभवता आले. विदर्भ ते कोकण, चांद्यापासून खांद्यापर्यंतची ही यात्रा होती. या यात्रेसाठी भली मोठी बस होती ज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे आमदार एकत्र प्रवास करायचे. सुरुवातीला एसी बस मुळे या यात्रेवर टीका झाली मात्र यात्रा जसजशी पुढे जात राहिली तसेतसे लोक या यात्रेशी जोडू लागले. जाहीर सभा, चौक सभा, शेतकऱ्यांची घरी भेटी, बांधांची पाहणी अशी विविध गोष्टी या यात्रेदरम्यान केल्या जात. या सभा कव्हर करणे, सभा सोशल मीडियावर लाईव्ह करणे, व्हिडिओ शूट करून ऑफिसला पाठवणे श, कंटेंट लिहणे या सगळ्यांची जबाबदारी आमच्यावर होती. या सगळ्यात दादांचा बारीक लक्ष असायचं कधी चुकलो तर ओरडाही पडायचा पण तासाभरात दादा पुन्हा विचारपूस करायचे. याच यात्रेदरम्यान दादांना एक तरुण पत्रकाराने चिड आणणारा प्रश्न विचारला, दादांनी त्या तरुण पत्रकाराला तीथेच झापले पण दुपारच्या जेवणावेळी दादांनी त्या पत्रकाराला आवर्जून जेवणाची विचारपूस, इतकेच नव्हे तर त्यांच्या स्टाईल मध्ये म्हटले… प्रश्न विचारण्याआधी जरा तब्येत बनव… कसला बारीक आहेस.. लागलीच वाढपीला बोलून म्हणाले ए… याला तुप घाल… तर असे होते दादा..

मविआ सरकार स्थापन करतानच्या ही बऱ्याच घडामोडी आहेत. त्यावर एक पुस्तक काढले तरी कमी पडेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटली, दादा भाजपसोबत सरकारमध्ये गेले मात्र त्यांना बऱ्याच गोष्टी अपूर्ण वाटायच्या असं त्यांच्या देहबोलीतून जाणवायचं. पण मागील महिन्याभरापासून दादांच्या देहबोलीत कमालीचा बदल झाला होता. एरवी “कोई ले ना रे पर मैं तो शपथ लेने वाला हूं” असे म्हणणारे दादा “ज्यांनी ७० कोटींचा घोटाळा केला असा आरोप केला त्यांच्या सोबत सरकारमध्ये आहे की नाही” असे मिश्किलपणे बोलू लागले. मधल्या काळात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या ज्या बातम्या येत होत्या त्यादरम्यान अजितदादांचा कॉन्फिडन्स प्रचंड वाढलेला दिसला. कुणाला शिंगावर घेण्याची त्यांची तयारी दिसत होती. म्हणूनच तर महानगरपालिका निवडणुकीच्या एका प्रचारसभेत ते म्हणाले “तु असशील मोठ्या बापाचा पण मी पण कमी नाही, मी पण मोठ्या काकांचा पुतण्या आहे, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे” विलिनीकरण कारणामुळे, आपला काका आपल्या सोबत आल्यामुळे आपली ताकद द्विगुणित होईल याचा विश्वास अजित दादांना वाटत होता. म्हणूनच कदाचित जाण्याआधी या विलिनीकरण जे खडा टाकत होते त्यांना उद्देशून दादा एका सभेत म्हणाले की, “आम्ही दोघं एकत्र येतोय तर तुमच्या पोटात कशाला दुखतंय ?”

विलिनीकरण होईल की नाही, राष्ट्रवादीचं काय होईल हा येणारा काळच ठरवले पण अजितदादांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राचे तर मोठे नुकसान झालेच आहे पण महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचंही मोठं नुकसान झालं आहे.

लेखन- निलेश बनकर

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांचे भावूक उद्घगार, अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच खरी श्रद्धांजली अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशीच काहीशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *