अजित पवार यांचे आवाहन, त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोंकासोबत फिरा

महाराष्ट्राचा विकास हाच आपला अजेंडा आहे. त्या अजेंडयापासून तसूभरही मागे पडायचे नाही असे सांगतानाच राज्याचे हित हेच आपले टार्गेट असले पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिर्डी येथील नवसंकल्प शिबिरात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबीराची सांगता रविवारी (१९ जानेवारी) झाली. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशा पध्दतीने पुढे न्यायचे आहे याचा कानमंत्र देतानाच इकडेतिकडे करणार्‍या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्माचा आदर करणारा आहे हे कृतीतून दिसले पाहिजे. नेत्यांपेक्षा हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे हेही स्पष्ट झाले पाहिजे. नेत्यांसोबत फिरण्यापेक्षा लोकांमध्ये जा… हा पक्ष लोकांचा वाटला पाहिजे यासाठी काम करा असा आदेश देत शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा ही आपली आहे आणि ती कायम राहिल. यासाठी तुमची साथ मला हवी आहे असे आवाहनही यावेळी केले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एक जबाबदार कार्यकर्ता तयार करून त्याच्यावर २५ कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपवा. प्रभागात ५० कार्यकर्ते तयार करा. त्यातून २० हजार कार्यकर्त्यांची फळी उभी राहिल. राज्यातील प्रत्येक महानगरपालिकांमध्ये अशी यंत्रणा तयार केली तर निवडणूकीत पक्षाला फायदा निश्चित होणार असल्याचा दावाही यावेळी केला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, साईबाबांच्या कर्मभूमीत आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीतून विकासाची दिशा आणि पुरोगामी विचाराची वाटचाल आपण नवसंकल्प शिबीरातून करत आहोत. येणारा काळ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असला पाहिजे. प्रत्येक गावात राष्ट्रवादीचा फलक (बोर्ड) आणि झेंडा कसा लागेल असा प्रयत्न सर्वांनी करा अशी ताकीदही दिली.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे. एकतेचा आणि समतेचा विचार इथे रुजलेला आहे. जातीपातीचे राजकारण जास्त दिवस चालत नाही. पण सध्या तशापध्दतीने सध्या जातीपातीचे राजकारण सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत महायुतीला बहुमत प्रचंड मिळाले असून जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे. आता आपल्याला ती जबाबदारी पार पाडायची असल्याचेही यावेळी सांगितले.

लाडकी बहिण योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू ठेवायची आणि त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे याचा वेगळा विचार सध्या सरकार करत आहे. विधानसभेत जे अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे. हे यश माझ्या एकट्याचे नसून माझ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे असल्याची स्पष्ट कबुलीही यावेळी दिली.

पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांची जनमानसात प्रतिमा खराब आहे त्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचे नाही असे स्पष्टपणे नमूद करतानाच पक्षात कुणाशीही गैरवर्तन होईल असे काम करणाऱ्या व्यक्तीची तात्काळ हकालपट्टी करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पक्ष संघटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. याशिवाय या बैठकीला महिन्यातील एक दिवस ठरवून सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कामाबरोबरच पक्षाचाही कार्यक्रम घेणार असल्याचे सांगत वैद्यकीय सहाय्यता कक्ष सेल आणि वचनपूर्ती सेल या दोन सेलची घोषणाही यावेळी करत अजित पवार म्हणाले की, वैद्यकीय सहाय्यता सेल हा उपमुख्यमंत्री कार्यालयातून राबवला जाईल तर वचनपूर्ती हा सेल उपमुख्यमंत्री कार्यालय आणि प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

अजित पवार शेवटी बोलताना म्हणाले की, आता तुमच्या सगळ्या सहकार्याने राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवून द्यायचा आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून हे काम करायचे आहे. त्यासाठी विधानसभेत जसे दौरे केले त्याचपध्दतीने महाराष्ट्रात दौरे करणार असल्याचेही यावेळी सांगितले. असे अजित पवार यांनी जाहीर केले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा विश्वास, काँग्रेस हाच भाजपाला सक्षम पर्याय २०२९ साली देशात काँग्रेसची सत्ता काँग्रेसच्या कोकण विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील उमेदवार व लोकप्रतिनिधींच्या तीन दिवसीय कार्यशाळेचा शानदार शुभारंभ

काँग्रेस पक्ष देशात व राज्यात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे. काँग्रेस हाच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *