Breaking News

अंबादास दानवे यांचा आरोप, नरेंद्र मोदींच्या सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर

राज्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असून लोकसभा निवडणूक २०२४ चे कामकाज सुरु झाले आहे. त्यासाठी केंद्रिय निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता जाहिर करण्यात आलेली आहे. असे असताना प्रभारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. एक प्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार उचित कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांना पत्राद्वारे केली.

अंबादास दानवे पुढे आपल्या पत्राद्वारे म्हणाले की, देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे राज्यात सर्वत्र राजकीय पक्षांकडून त्यांचे पालन करुन नेत्यांच्या सभा सुरु असून चौथ्या टप्यातील प्रचाराची कामे सुरु आहेत. परंतु देशाचे पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी या आचारसंहितेचा भंग करुन ज्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत त्या ठिकाणी मोठया प्रमाणात रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात येत असून स्वच्छतेसाठी स्थानिक प्रशासनाकडून मोठया प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी मोदी येणार असल्याने विमानतळापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंतच्या रस्त्याची डागडूजी व स्वच्छतेची कामे कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आल्याचा मुद्दाही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला.

पुढे आपल्या पत्रात अंबादास दानवे म्हणाले की, वास्तविक पाहता इतर वेळी देशाचे पंतप्रधान किंवा इतर राजकीय महत्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी अशी कामे करण्यात येत असतात. परंतु लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात आदर्श आचारसंहिता सुरु असताना नरेंद्र मोदी यांच्या बैठकांच्या स्थळी जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशी कामे शासकीय यंत्रणेचा वापर करुन करण्यात येत असल्याने एक प्रकारे हा निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असल्याचा आरोप केला.

निवडणूक आयोगाला अंबादास दानवे यांनी लिहिलेले हेच ते पत्र

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *